संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता – हवामान विभाग
महाराष्ट्र स्पीड न्युज
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र अधिक खोलवर गेल्याने त्याची दिशा पश्चिम-वायव्य अशी राहिल त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ तसेच कोकणात बऱ्याचशा ठिकाणी येत्या चार-पाच दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भूते यांनी ही माहिती दिली.
तसेच येणाऱ्या आठवड्यात (११ ते १७ ऑक्टोबर) महाराष्ट्रात कोकणासह आतल्या भागात पाऊस पूर्णत: सक्रीय राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापणीला आलेल्या पीकांवरती दाट प्रभाव होण्याची शक्यता आहे, असा इशारा मुंबईच्या हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे.
पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण
पुणे शहर आणि परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते, सकाळपासून सूर्यदर्शनही झाले नाही. काल रात्रीतून शहरात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आज दिवसभर ढगाळलेले वातवारण होते, काही ठिकाणी पावसाने हजेरी देखील लावली.