मानव्याला कवेत घेणारे अण्णाभाऊंचे साहित्य विश्व – डॉ. दत्तात्रय घोलप
बार्शी-महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी नगरपालिका बार्शी यांच्यावतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव 2020 ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आले. अण्णाभाऊंचे कादंबरी विश्व या विषयावर डॉक्टर दत्तात्रय घोलप यांचे व्याख्यान झाले. व्याख्यानाचे पहिले दुसरे गुंफले गेले. डॉक्टर दत्तात्रय घोलप हे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे प्राध्यापक म्हणून काम करतात ते साहित्यिक संशोधक आहेत.
या व्याख्यानात डॉक्टर दत्तात्रय घोलप म्हणाले,, अण्णाभाऊंचे साहित्य हे मानव्यालाला कवेत घेणारे आहे, अण्णाभाऊंचा बार्शीशी असणारा संबंध अमर शेखां मुळे घनिष्ठ झालेला आहे. कॉम्रेड शाहिद गोविंद पानसरे यांनी सुरू केलेले अण्णाभाऊंच्या नावाचे साहित्य संमेलन हे बार्शीत विचारांचा जागर घालणारे होते. बार्शी नेहमीच परिवर्तनाची प्रागतिक विचारांची वाट चोखाळणारी राहिलेली आहे. लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला अण्णाभाऊंनी लोकचळवळीचे रूप दिले. शाहीरी बाणा असणारे कादंबरीकार म्हणून अण्णाभाऊंना ओळखले जाते. अण्णाभाऊंच्या साहित्याला पन्नास वर्षे लोटली तरी या कादंबऱ्यांना आजही अवकाश मिळतो आहे कारण कादंबऱ्यांमध्ये रांजल्या, गांजल्या कष्टकऱ्यांसाठी अण्णाभाऊंनी मुल्य निर्णय घेतलेला आहे. मुंबईच्या लेबर कॅम्प ते वारणेचा वाघ, चोर, गुन्हेगार, वेश्या, भटके यांच्या जगण्याची वाट त्यांच्या कादंबऱ्यांमधून मोकळी करून दिली आहे. एका बाजूला त्याकाळी रोमॅण्टिक, राजेरजवाडे यांचे उदात्तीकरण, प्रेमाचा त्रिकोण मांडला जात होता, साहित्य समाजाचे फारकत घेत होते कलेसाठी कला अशी बाजू मांडणारे लेखक एका बाजूला तर दुसर्या बाजूला अण्णाभाऊ मार्क्सवादी पद्धतीने जीवन वास्तवाला भिडत होते. कष्टकऱ्यांसाठी ठाम भूमिका घेऊन सांस्कृतिक हस्तक्षेपाचे राजकारण अण्णाभाऊंनी दीनदुबळ्यांच्या बाजूने केल्याचे त्यांच्या कादंबरीच्या प्रस्तावनेतून दिसते. दलित साहित्य संमेलनातील अण्णाभाऊंची भूमिका, युगांतर मधील लेख यामधून अण्णाभाऊंची लेखक म्हणून भूमिका स्पष्ट झालेली आहे. वर्ण वर्ग व्यवस्थेला अण्णाभाऊ भिडले होते. गावच्या समृद्धीसाठी त्याग करणारा दीनदुबळ्यांसाठी लढणारा मातंग नायक फकीरा अण्णा भाऊंनी उभा केला. अण्णाभाऊंनी माकडीचा माळ या कादंबरीत भटक्यांचे लोकविलक्षण जगण्याची ची मांडणी मराठी साहित्य विश्वात पहिल्यांदाच केली. डार्वी गोसावी, फासेपारधी साप गारुडी, तमासगीर, भानामतीवाले भटक्यांचे सत्प्रवृत्ती,खलप्रवृत्ती, मैत्रभाव, बंधुभाव, वैरभाव, कलह, भांडणे, जिव्हाळा, प्रामाणिकपणा, द्वेष, राग, मत्सर,आपुलकी गुन्हेगार म्हणून ज्यांना पाहिले गेले अशांचे वृत्ती प्रवृत्तींचे महाभारतच अण्णाभाउंनी मांडले आहे. जगण्यावर अपार प्रेम करणारी माणसे त्यांनी त्यांच्या साहित्यात मांडली. स्त्रीप्रधान व्यक्ती रेषा स्त्रियांचे जग चित्रा, वैजयंती, आवडी, फुलपाखरू, रत्ना, चिखलातील कमळ, चंदन इत्यादी यामध्ये तमासगीर, मुरळी,अभावग्रस्त जिने जगणारे स्त्रीचे जग त्यासोबतच स्त्री शोषणाचे वेगवेगळे पदर सापळे यांची अण्णाभाऊंनी पोलखोल केली आहे. पिचलेपणाच्या कहाण्या सोबत घेऊन दारिद्र्याची झुंजणाऱ्या परंतु आपले पावित्र्य जपणार्या अशा नायीका यांचा मूल्य निर्णय अण्णाभाऊंनी त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये केला आहे. यासोबतच असणारा कनवाळू दृष्टिकोण सोबतच जीवावर उदार होणाऱ्या स्त्रिया त्यांनी रेखाटल्या. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या भविष्याची वाट आश्वासक करणाऱ्या क्रांतिकारी मन नव्या युगाचे स्वागत करणाऱ्या अशा आहेत. न बोलणाऱ्याचे जिने अण्णा भाऊंनी त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये मांडले आहे. लेखक हा पक्षपातीच असतो आणि अण्णाभाउंनी हा पक्षपात करून दीनदुबळ्यांची कष्टकऱ्यांची बाजू घेतलेली आहे. सध्या लेखक हा राष्ट्रप्रेमी की राष्ट्रद्रोही असा संघर्ष उभा असताना लेखकाला राष्ट्रप्रेम हे त्याच्या विरोधी मूल्य आहे कारण सीमेच्या पलीकडील किंवा सेनेच्या अलीकडील सर्व मानवांवर लेखक प्रेम करतो असेच प्रेम अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्या मध्ये केलेले आहे. अण्णाभाऊंनी कष्ट करणारा हात पृथ्वी पेलताना दाखवला आहे तोच हात आता बदलासाठी पुन्हा पुढे आला पाहिजे असेही मत त्यांनी मांडले.
या व्याख्यानमालेसाठी एडवोकेट असिफ तांबोळी, कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. या ऑनलाईन व्याख्यानाच्या व्याख्यात्यांची ओळख श्रीधर कांबळे सर यांनी करून दिली. तर आभार कॉम्रेड प्रवीण मस्तुद यांनी मानले. या व्याख्यानाची तांत्रिक जबाबदारी पवन आहिरे यांनी पाहिली.