बार्शीत सोयाबीन हमीभाव केंद्रास मंजुरी, नोंदणी सुरू
बार्शी : शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन खरेदीस मंजुरी मिळाली आहे. बार्शी तालुक्यात खरेदीसाठी तुळजाभवानी कृषी व साधन सहकारी संस्था, उंबरगे ता बार्शी या संस्थेची सबएजंट म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यासाठीची नोंदणी सुरू झाली आहे. एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ३८८० रुपये हमीभाव जाहीर झाला आहे.
“१ ते १५ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. एकरी किती खरेदी करायचे याबाबत आदेश येतील. त्यानंतर दि १५ च्या पुढे प्रत्यक्ष खरेदी सुरू होईल. सोयाबीन साठी प्रतिक्विंटल ३८८० रुपये हमीभाव आहे. शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यात विहित कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा.” बी बी वाडेकर, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, सोलापूर
यंदा वेळेवर पाऊस झाल्याने सोयाबीनचा मोठया प्रमाणात पेरा झाला होता. बार्शी बाजार समितीसह वैराग उपबाजारात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. बार्शीत ७ ते ८ हजार तर वैराग मध्ये १ ते दीड हजार कट्ट्यांची आवक होत आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तालुक्यात गौडगाव येथेही व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जात आहे. बार्शीत मालाची प्रतवारी तसेच आर्द्रता नुसार प्रतिक्विंटल २५०० ते ३७०० च्या दरम्यान सध्या भाव आहे. हमीभाव पेक्षा बाजारातील भाव सध्या कमी आहेत. बाजारातील भाव पडल्यानंतर शासन बाजारात हस्तक्षेप करून नाफेड व राज्य मार्केटिंग फेडरेशन मार्फत शेतमालाची खरेदी करते. त्यानुसार येथे हमीभाव केंद्र मंजूर झाले आहे. सब एजंट असलेल्या तुळजाभवानी संस्थेने दि १ ऑक्टोबर पासून नोंदणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, संबंधित पिकाची नोंद असलेला सन २०२०-२१ चा सात बारा, आठ अ सह बार्शी उच्चतम बाजार समितीतील धनश्री कृषी केंद्र येथे नोंदणी साठी संपर्क साधावा असे आवाहन तुळजाभवानी संस्थेच्या वतीने वालचंद मुंढे यांनी केले आहे