March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला

सिंधुदुर्ग ः

Advertisement

दक्षिण-पश्‍चिम मान्सूनच्या नॉर्मल कॅलेंडरनुसार ज्या तारखेला म्हणजेच 23 ऑक्टोबरला परतीच्या मान्सूनने भारत देश सोडायला हवा होता, त्या तारखेला यावर्षीचा परतीचा मान्सून मध्य प्रदेशातच ठाण मांडून बसला आहे. 23 ऑक्टोबर रोजी भारतीय हवामानशास्त्र विभागाने जारी केलेल्या वेदरमॅपनुसार परतीच्या प्रवासाला निघालेला दक्षिण-पश्‍चिम मान्सून कसाबसा मध्य प्रदेशात पोहोचला आहे.

हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीक पावसात कुजत असतानाच परतीच्या या मान्सूनचा वाढलेला पाहुणचार शेतकर्‍यांच्या मनात मात्र धडकी भरविणारा आहे. मान्सूनचे नॉर्मल कॅलेंडर असे सांगते की, 15 ऑक्टोबर या तारखेला परतीचा मान्सून कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांच्या दक्षिण सीमांपर्यंत पोहोचायला हवा होता.

ईशान्य भारतातूनही तो या तारेखला ‘एक्झिट’ होणे अपेक्षित होते; पण ज्या मान्सूनने आपला परतीचा प्रवास उत्तर भारतातून दक्षिणेकडे 28 सप्टेंबर रोजी सुरू केला तो 26 दिवस उलटले तरी मध्य प्रदेशपर्यंतच पोहोचला आहे. इतरवेळी साधारणपणे परतीच्या मान्सूनचा संपूर्ण भारतातला प्रवास

27 दिवसांचा असतो.

नॉर्मल कॅलेंडरनुसार 17 सप्टेंबर रोजीच परतीच्या मान्सूनने भारत-पाकिस्तान सीमेवरून काढता पाय घ्यायला हवा होता. परंतु प्रत्यक्षात यावर्षी 11 दिवसांनी उशिरा त्याने दक्षिणेकडे कूच केली. 28 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत त्याने काहीशा धिम्या गतीने पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश अगदी गुजरातपर्यंतची राज्ये पादाक्रांत केली खरी, परंतु त्यानंतर आश्‍चर्यकारकरित्या तो रेंगाळत राहिला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने जाहीर केल्यानुसार शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी पर्यंत महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्‍चिम बंगाल ते आसाम या राज्यांच्या उत्तर सीमांपर्यंतच तो पोहोचला आहे. अजून हा त्याचा पाहुणचार महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्‍चिम बंगाल व दक्षिण भारत आणि संपूर्ण ईशान्य भारत येथे सुरूच आहे.

तळकोकणात आणि ईशान्य भारतात पाऊस

भारतीय हवामान शास्त्र विभागाने जाहीर केल्यानुसार ईशान्य भारतात शुक्रवारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. तळकोकणातही ढगाळ वातावरण होते. तसेच काही प्रमाणात पावसाच्या सरीदेखील पडल्या. स्कायमेट वेदर या हवामानविषयक खासगी संस्थेने जारी केलेल्या वेदरमॅपनुसार 24 ऑक्टोबर रोजीही ईशान्य भारत आणि तळकोकणात पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्‍त होत आहे.

Leave a Reply