June 7, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

बार्शी ;

शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, सांस्कृतिक विभाग व अग्नि कुल यांच्या वतीने रविवार  दिनांक ०६ जून २०२१ रोजी  शिवस्वराज्य दिन कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे तथा साधन व्यक्ती म्हणून सौ.शोभाताई सोपल कनिष्ठ महाविद्यालय, वैराग येथील प्रा. बाळासाहेब गव्हाणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ एस एस गोरे होते.

Advertisement

कोव्हीड १९ च्या महामारीमुळे महाविद्यालयाने बंद आहेत. मात्र ऑनलाईन पध्दतीने सर्व शैक्षणिक कामकाज सुरू आहे. अध्ययन, अध्यापन, प्रशिक्षण, मूल्यमापन तसेच सर्जनशीलता व व्यक्तिमत्त्व विकास संदर्भातील उपक्रमाचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. याचा महाविद्यालयातील बी. एड., बी. पी.एड, एम एड ,एम पी एड, पीएच डी, शालेय व्यवस्थापन पदविका व एम ए शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थींना फायदा होत आहे.

मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांच्या प्रपत्रानुसार  ०६ जून  हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे आदेश महाविद्यालयांना देण्यात आले होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे महान कार्य विद्यार्थ्यांच्या मनावर प्रतिबिंबित व्हावे यादृष्टीने शिवचरित्रपर व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवर व सहभागीचे स्वागत कु. तब्बसूम पटेल यांनी केले. याद्वारे त्यांनी कार्यक्रमाचा हेतू सविस्तर विशद केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  यानंतर सर्वांनी ऑनलाईन पध्दतीने महाराष्ट्र गीत गायन व श्रवण केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. अल्पना पिंपळे यांनी करून दिला.

कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे तथा साधन व्यक्ती व सुप्रसिद्ध व्याख्याते मा. प्रा. बाळासाहेब गव्हाणे यांनी शिवचरित्रपर  अभ्यासपूर्ण, मौलिक व प्रेरणादायी व्याख्यान दिले. यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचे विशेष गुण उदाहरणांसह स्पष्ट केले. शिवाजी महाराजांच्या उत्कृष्ठ प्रशासक, दूरदृष्टी, शिस्त, नैतिकता, संयमी वृत्ती, तंत्रज्ञान, राष्ट्रवाद आदि गुणविशेषाबाबत मार्गदर्शन केले. शिवरायांचे ऐतिहासिक कार्य विविध प्रसंगातून  व प्रभावी विवेचनातून स्पष्ट केले. शिवाजी राजांनी रयतेच्या हिताची नेहमी काळजी घेतली. शूर मावळ्यांच्या धाडसातून व त्यागातून स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. परकियांची जुलमी सत्ता नष्ट केली. लोककल्याणाची कामे करून शांतता व सुव्यवस्था निर्माण केली. जगाच्या इतिहासात शूर व  महान पराक्रमी राजा म्हणून  छत्रपती शिवाजी महाराजांचाच उल्लेख केला जातो. प्रत्येकाने शिवचरित्राचा अभ्यास केला पाहिजे. दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी शिवचरित्र दिशादर्शक आहे. शिवचरित्रातून प्रेरणा व मार्गदर्शन मिळते. विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासना करून चिंतन केले पाहिजे. भौतिक जीवनातील समस्यांना सामोरे गेले पाहिजे . विविध ऐतिहासिक प्रसंगातून  राष्ट्र निर्माता व लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य महान आहे असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ एस एस गोरे यांनी शिवस्वराज्य दिन साजरा करण्याची भूमिका विशद केली. रयतेचे राज्य अखंडित व चिरंतन राहावे या उद्देशाने शिवराज्याभिषेक करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक स्तरावरील एक महान व पराक्रमी राजे होते.  व्यवस्थापन, प्रशासन, संघटन, नियोजन, मुत्सद्दीपणा आदि कौशल्यातून शिवाजी महाराजांनी परकीय सत्तेशी लढा दिला. रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. महिलांचा आदर व सन्मान केला. शूर मावळ्यांमध्ये जिद्द, चिकाटी व संस्कार विकसित केले. प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य निर्माण झाले. हेच स्वराज्य सुराज्य म्हणून ओळखले जाऊ लागले. अशा या महान , शूर व पराक्रमी राजाचे  प्रेरणादायी विचार सर्वांनी आचरणात आणावे  असे आवाहन केले.

कार्यक्रमासाठी  उपस्थित सर्वांचे आभार श्री. आश्रुबा वाघमारे यांनी मानले. कु. धनश्री सोनके यांनी कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी  सामूहिक राष्ट्रगीत ऑनलाईन पध्दतीने गायन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ एस एस गोरे, आय क्यू ए सी समन्वयक डॉ व्ही पी शिखरे,  सांस्कृतिक प्रमुख डॉ एस डी भिलेगावकर, कार्यक्रम समन्वयक व कुलमार्गदर्शक डॉ एम व्ही मते, अग्नि कुलाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच  सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply