पुण्यातील वारजे भागातील एका बांधकाम व्यावसायिकावर हल्लेखोरांनी केला पिस्तुलमधुन गोळीबार
पुणे –
पुणे शहरातील वारजे भागातील एका बांधकाम व्यावसायिकावर हल्लेखोरांनी पिस्तुलमधुन गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला. बांधकाम ठेकेदाराने घटनास्थळावरून पलायन केल्याने तो बचावला. हल्लेखोरांनी त्याच्या दिशेने चार गोळ्या सोडल्या. आर्थिक वाद अथवा पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली.
A builder in Warje area of Pune was attacked by assailants with a pistol
रवींद्र सखाराम तागुंदे (वय 36 , रा. वारजे,पुणे) असे संबंधित बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे.
हल्लेखोर सीसीटिव्हीत कैद झाले आहेत. हल्लेखोरांना पकडण्यासाठी स्थानिक पोलीसासह गुन्हे शाखेच्या पोलिसांची विविध पथके रवाना झालेली आहेत.
तागुंदे याचे वारजे भागातील वंडर फ्युचरा इमारतीत कार्यालय आहे. तो बांधकाम ठेकेदार असून जमिन विक्रीचा व्यवसाय करतो.
शनिवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास तो ठेकेदार कार्यालयात आला. त्यावेळी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून दोन दुचाकीवरून चौघे हल्लेखोर तागुंदेच्या कार्यालयासमोर अचानक आले. तागुंदे कार्यालयाबाहेर थांबला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर कामगार होते. काही वेळानंतर कामगार तेथून निघुन गेले.
हल्लेखोरांनी तांगुदेच्या कार्यालयासमोर दुचाकी लावली व काही समजायच्या आत पिस्तुलातून दोन गोळ्या हल्लेखोरांनी तांगुदेच्या दिशेने झाडल्या. गोळीबार झाल्यानंतर तो घाबरला आणि पाठीमागील बाजूस असलेल्या टेकडीच्या दिशेने धावत सुटला.
हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरू केला. हल्लेखोरांनी तागुंदेच्या दिशेने पिस्तुलातून दोन गोळ्याही झाडल्या. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून बाह्यवळण मार्गावरून वारज्याच्या दिशेने पसार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड व वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.