केंद्रीय भरतीसाठी आता मुलाखती नाहीत, लेखी परीक्षेद्वारे होणार निवड
नवी दिल्ली :
केंद्र सरकारकडून होणार्या नोकर भरतीसाठी मुलाखती न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कामगार मंत्री जितेंद्र सिंह यांनी शनिवारी ही माहिती दिली. २३ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये गट ब (विना राजपत्रित) आणि गट क दर्जाच्या पदांसाठी भरतीप्रक्रिमध्ये मुलाखती रद्द करण्यात आल्या असल्याचे सिंह यांनी सांगितले.
सरकारी नोकर्यांमधील भरतीच्या वेळी होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी २०१५ साली पंतप्रधान मोदी यांनी कनिष्ठ पदांसाठी घेण्यात येणार्या मुलाखती रद्द करण्यात येतील अशी घोषणा केली होती. या घोषणेनुसार आता मनुष्यबळ आणि प्रशिक्षण विभागाने अशा पदांचा शोध घेतला आहे.
त्यानुसार केंद्र सरकार अंतर्गत येणार्या नोकर भरतीसाठी मुलाखत संपुष्टात आणण्याची पंतप्रधानांची घोषणा पूर्ण केल्याचे सिंह यांनी सांगितले. यापुढे निवड प्रक्रिया लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल.
महाराष्ट्र आणि गुजरातसारखी काही राज्ये हा निर्णय लागू करण्यास तयार होती, मात्र काही राज्ये या निर्णयाच्या विरोधात होती. सरकारच्या पाठपुराव्यानंतर जम्मू-काश्मीर, लडाखसह भारतातील आठही केंद्र शासित प्रदेश व देशातील २८ पैकी २३ राज्यांनी मुलाखती घेणे बंद केले.