गॅस एजन्सीत काम करत लातुर जिल्ह्यातील तरूण जपतोय सामाजिक बांधिलकी.उभारली देशी झाडांची बिज बॅक
लातुर;
आवड असली की सवड मिळतेच याचाच प्रत्यय लातुर जिल्ह्यातील एका तरूणाने दाखवलेल्या कार्यातुन समोर आले आहे.
गॅस वितरण एजन्सीमध्ये काम करत करत मोकळ्या वेळेमध्ये विविध देशी झाडांच्या बिया गोळा करण्याचा छंद लागला व बघता बघता त्याने छोट्याशा घरात मोठी अशी बीज बँकच तयार केली आहे.आता कोणीही फोन केला तरी तत्काळ तुम्हाला पोस्टाने बिया घरपोच मिळतील अशी सोय महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रेणापूर गावातील रहिवासी तरुणाने केलेली आहे.
Working in a gas agency, keeping the youth of Latur district in social commitment.
शिवशंकर दगडू चापुले असे त्या वृक्ष प्रेमी तरूणाचे नाव आहे.हा तरुण फक्त बारावी पास आहे मात्र त्याला बालपणापासूनच झाडांच्या निरीक्षणाची आवड लागलेली होती. त्यामधुनच त्याला विविध झाडांच्या बिया संकलन करण्याचा छंद लागला. पर्यावरणप्रेमी शिक्षक मिलिंद गिरधारी व पोलीस अधिकारी धनंजय गुट्टे यांच्या प्रोत्साहनामुळे त्याला देशी झाडांच्या बियांनाची बँक करण्याचे प्रोत्साहन मिळाले व बघता बघता त्याने 75 प्रकारच्या देशी झाडांच्या बियांची बँकच तयार केली.
फेसबुकवर चालवली जाते बीजबँक;-
अनेक जण व्यक्तिगत पातळीवर तसेच संस्थात्म स्वरूपात झाडे लावण्याचे काम अनेक ठिकाणी करतच असतात. मात्र काही ठिकाणी विदेशी म्हणजेच स्थानिक नसलेली गुलमोहोर, रेन ट्री, काशीद,पिकचारी, टेबूबिया यांसारखी व इतर अशीच प्रकारची झाडे लावली जात आहेत, या झाडांचा स्थानिक पर्यावरणाला कसल्याही प्रकारचा लाभ होत नाही. विदेशी झाडाऐवजी स्थानिक देशी झाडे लावली जावीत व त्या झाडांचा फायदा सर्व जैवविविधतेसाठी व्हावा या हेतूने रेणापूर मधील निसर्गमित्र शिवशंकर चापुले याने रेणापूरसह लातूर जिल्हा परिसरात फिरून निर्मली, पांढरा पांगारा, शमी, मांसरोहिनी, दहीपळस, कृष्णशिरीष, चारोळी, पाच पानाचा पळस, खैर, अर्जुन, काटेसावरसारख्या 75 प्रकाराच्या देशी झाडे आणि दुर्मीळ होत असलेल्या औषधी वनस्पतींच्या बिया जमा केलेल्या असून या जमा केलेल्या बिया फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून ज्यांना देशी झाडे लावण्याची आवड आहे अशांना या बिया संपूर्ण महाराष्ट्रात नि:शुल्क पाठवल्या जातात. ज्यांना स्वत: जाऊन बिया घेणे शक्य नाही त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात या बिया पोस्टानेही पाठवल्या जातात.
शिवशंकर चापुले हा तरुण रेणापूर येथे एच.पी. गॅस एजन्सीमध्ये नोकरीस आहे.उल्लेखनीय बाब ही की दर रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी ते परिसरातील डोंगर भाग, जंगल भागात फिरून विविध झाडांचा शोध घेतात. तसेच त्या झाडांच्या बिया गोळा करतात. या जमा केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया ते आपल्या लहानशा घरातील एक खोलीत ठेवतात. प्लास्टिक जगाला भेडसावणारी समस्या असून प्लास्टिकच्या पुनर्वापराचा संदेश देत या जमा केलेल्या बिया साठवण्यासाठी शीतपेयाच्या रिकाम्या बाटल्या तसेच चॉकलेटच्या रिकाम्या बरण्यांचा उपयोग केलेले आहे.