“मासिक पाळी आणि अंधश्रद्धा”
✍ साधना काकडे
गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, बार्शी
मासिक पाळी ही स्रियांच्या आयुष्यातील एक महत्वाची अशी नैसर्गिक घटना आहे.मुलगी वयात येऊन प्रजोत्पादनास योग्य झाल्याची, ती निसर्गाने करून दिलेली जाणीव आहे.स्रीचे गर्भाशय जीवधारणेस, त्याच्या संगोपनास तयार झाल्याची ती खुण आहे.निसर्गक्रमाने घडणारी घटना आहे.थोडक्यात स्री निर्मितीक्षम झाल्याची चाहुल मासिक पाळीमुळे लागते.
“Menstruation and Superstition”
खरं तर निर्मितीक्षम झाल्याचा आनंद या क्षणामुळे स्रीजीवनात निर्माण व्हायला हवा.तथापी प्राचीन काळापासुन हा क्षण स्री च्या आयुष्यात आनंद देणारा कमी, व तिच्या आजपर्यत असलेल्या स्वच्छंद आयुष्यावर, बंधनं घालणारा ठरतो.त्यामुळे मासिक पाळी सुरू झाल्यानंतर एका निष्पाप हसर्या बालिकेचं रूपांतर, एका लाजर्याबुजर्या, खरं तर भेदरलेल्या, गोंधळलेल्या तरूणीत होतं.मासिक पाळीचं चक्र, त्यामुळे होणारा शारीरिक त्रास,शरीरात होणारे, शरीराला आकार देणारे शारीरिक बदल,या सर्व गोष्टींमुळे तिचं भावविश्वच ढवळुन निघतं.हे सर्व काय आहे?आणि अचानक कसे? या प्रश्नात ती गुरफटुन जाते.
हे कमी की काय म्हणुन, आतापर्यंत तिच्या अवखळ वागण्याचं कौतूक करणारे घरातले वडीलधारे, तिला वागण्या बोलण्याबाबत, कसे राहावे याबाबत विविध सूचनावजा आदेश देऊ लागतात.हे सगळं कशामुळे याबाबत मुलीला फारशी कल्पना घरातून मिळालेली नसते.थोडीफार कल्पना आईने दिलेली असते, पण त्यात विज्ञान कमी आणि अंधश्रद्धा व रूढीपरंपरांचा जाच जास्त असतो.हे सगळं आईला, तिच्या आईने, तिला, तिच्या आईने; असे परंपरागत तिच्यापर्यंत पोहोचते.ज्यामुळे मासिक पाळीबद्दल तिची संकल्पना स्पष्ट होण्याऐवजी, तिच्या गोंधळात भर पडते.त्याचा परीणाम तिच्या मानसिकतेवर व जडणघडणीवर निश्चितपणे होतो. यातली सर्वात वाईट व मुलीच्या मानसिकतेवरच घाव घालणारी प्रथा म्हणजे, मासिक पाळी सुरू झालेल्या दिवसापासुन तीन ते पाच दिवस, तीला बाहेर किंवा बाजूला बसवणे. या कालावधीत त्या मुलीस पुर्णपणे अस्पृश्यतेची वागणूक दिली जाते.तीचे कपडे, भांडी वेगळी ठेवली जातात.ती इतर कुणालाही हात लावू शकत नाही, कुणाजवळ बसू शकत नाही.बरोबरच्या भावंडांशी मस्ती करू शकत नाही.देवघरात वगैरे जाऊ शकत नाही. हे सर्व का? तर म्हणे, या काळात ती अपवित्र असते, अस्वच्छ असते.यालाच अतिशय घृणास्पद असा”विटाळ” हा शब्द वापरला आहे. विटाळशी स्री, म्हणजे “अशुद्ध, अपवित्र स्री”! याला कुठलेही वैज्ञानिक स्पष्टीकरण नाही. आजही ग्रामीण भागात व काही प्रमाणात शहरी भागातसुद्धा स्रित्वाचा अपमान करणारी ही लांछनास्पद अशी रूढी”बाजूला बसली, बाहेर बसली, विटाळशी झाली”अशा नावांनी ही रूढी सुरू आहे.
या परंपरेचा उपयोग वैज्ञानिक दृष्टीकोन ठेऊन; करता येणे सहज शक्य आहे.कारण शरीरात होणार्या घडामोडींचा स्री ला पुष्कळ वेळा त्रास होतो.यात पोट, कमर दुखणे, जास्त रक्तस्रावामुळे अशक्तपणा येणे असे त्रास समाविष्ट असतात.यामुळे स्री ला या काळात शारीरीक विश्रांतीची गरज असते.जर तिला तशी विश्रांती दिली गेली, तर तिचे आरोग्य सुधारण्यास नक्कीच हातभार लागेल.पण घडते उलटे. कित्येकदा विवाहित स्री मासिक पाळीत असेल तर, तिला बाजुला बसवून, दिवसभर तिच्याकडून अंथरूण पांघरूण धुवून घेणे, फळीवरची भांडी घासून घेणे अशी जास्त श्रमाची कामे करून घेतलेली मी बघितले आहे.हा भांड्याचा ढीग, कपड्यांचा ढीग, पाणी किंवा गोमूत्र शिंपडून पवित्र करून घरात घेतला जातो.थोडक्यात या दिवसात स्रीला विश्रांती न देता रोजच्यापेक्षा जास्त काम देऊन शारीरीक, व बाजूला बसवुन मानसिक असा दुहेरी छळ केला जातो.
दुसरी अंधश्रद्धा म्हणजे या काळात अश्या स्री ने धार्मिक कार्यात,पुजाअर्चनेत भाग घेऊ नये.कारण देवाला विटाळ चालत नाही.मग अशा वेळेस खुपच गरज असेल तर गोळ्या घेऊन मासिक पाळी पुढे ढकलली जाते.साधारण अठ्ठावीस दिवसात किंवा महिन्याने घडणार्या ह्या निसर्गक्रमात केवळ अंधश्रद्धेपायी ढवळाढवळ केली जाते.याचा थेट परीणाम त्या स्री च्या आरोग्यावर होतो. वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करता या काळात गरज असते ती पुरेसा समतोल आहार, पुरेशी शारीरीक व मानसिक विश्रांती आणि शारीरीक स्वच्छता.पण या गोष्टींना महत्व न देता केवळ अंधश्रद्धांनाच खतपाणी घातले जाते.
मासिक पाळीत वापरावयाच्या कपड्यांची स्वच्छता हा आणखीन एक महत्वाचा विषय. पण याकडेही दुर्लक्ष केले गेल्याने, जननेंद्रियांशी संबंधित त्वचारोग उद्भवतात. मासिक पाळीत कपडे वापरले जात असेल तर, ते स्वच्छ धूवुन, डेटाॅलचे पाणी वापरून निर्जंतुक करून सुर्यप्रकाशात सुकवले पाहीजे.एक किंवा दोन वेळेनंतर ते नष्ट करून, नवीन वापरले पाहीजे. आता सॅनिटरी नॅपकीनचा थोड्याफार प्रमाणात सर्वत्रच वापर सुरू झाला आहे.मात्र वापरानंतर त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जाणे आवश्यक आहे. वरील मुददे हे सर्वात महत्वाचे मुद्दे आहेत. यासोबत इतरही काही महत्वाचे मुद्दे आहेत. पण निदान वरील अंधश्रद्धेबाबत प्रबोधन सर्वच स्तरात आवश्यक आहे. आजही नोकरी पेशा महीला घरात आल्यावर, वडीलधार्यांना दुखवणे नको म्हणुन या रूढी पाळतांना दिसतात. या अंधश्रद्धांना दुर्देवाने महीलांकडुनच खतपाणी घातले जाते.यात बदल महिलांनीच करणे आवश्यक आहे. प्रत्येक आईने, मी माझ्या मुलीच्या बाजुने ठाम उभी राहीन व अंधश्रद्धेच्या या दुष्टचक्रातुन तिला बाहेर काढीन हा निश्चय करून तो ठामपणे कृतीत आणला तरी, पुढच्या पिढीतील मुली यातून बाहेर पडतील, व मासिक पाळीच्या दिवसातही योग्य ती काळजी घेऊन”पंछी बनू, उडती फिरू,मस्त गगन में” असे गुणगुणत आनंदाने बागडतील.
✍ साधना काकडे
गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, बार्शी