‘बुचाड’ला मिळाला सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार
सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज
प्रा.विशाल गरड लिखित आणि दिग्दर्शित
बुचाड या लघुचित्रपटास तेलंगणा राज्यातील झहिराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल कमुनिटी मेडिया फिल्म फेस्टिव्हल या राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सदर पुरस्कार युनेस्कोचे प्रा.प्रविण पवराला यांच्या हस्ते विशाल गरड यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी डि.डि.एस चे डायरेक्टर पी.व्ही.सतीश, प्रसिध्द तेलगु दिग्दर्शक नाग अश्विन, राजेंद्र पाटील, चिन्ना परसम्मा, हैदराबाद विद्यापीठातील प्रा.कांचन मलिक यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक विशाल विजय गरड यांनी सदर पुरस्कार शेतकरी वेशात स्वीकारून तो अवकाळी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भारत देशातील तमाम शेतकऱ्यांना अर्पण केलाय. बुचाडचे छायाचित्रण सचिन नलावडे यांनी केले आहे तर संकलन अमोल लोहार यांनी केले आहे. या लघुचित्रपटात विशाल गरड, वैष्णवी जानराव, वैष्णवी काळे, कादंबरी गरड यांच्या मुख्य भूमिका आहेत.
दुःखाचे अनेक प्रकार असतात पण गेल्या शेकडो वर्षात न पाहिलेले आणि अनुभवलेले दुःख ‘बुचाड’ या लघुचित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांची अव्यक्त भावना व्यक्त करण्याचा हा एक गडद प्रयत्न असून. जंगलतोड, प्रदूषण, शहरीकरण, नद्यांचे विस्तारीकरण, औद्योगिकीकरण, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल या कारणांमुळे निसर्ग व्यवस्था बदलत चालली आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या भीमा नावाच्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याची गोष्ट ‘बुचाड’ या लघुचित्रपटात चित्रित करण्यात आली आहे.
चौकट
“या नविन क्षेत्रात टाकलेल्या पहिल्याच पाऊलाचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मान झालाय. यातून मिळालेला आत्मविश्वास आणि उत्साह भविष्यात माझ्याकडून अजून दर्जेदार कलाकृती निर्माण करण्यासाठीचे कारण ठरेल.”
लेखक तथा दिग्दर्शक : विशाल गरड