बारामती भागात पोल्ट्रीचे नुकसान,तिन हजार पिल्ले मृत्यू मुखी
उंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात बुधवारी (ता. 14) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ओढे- नाल्यांना महापूर आला होता. ओढ्याला आलेल्या महापूराच्या पाण्यामुळे रात्रभर बारामती – पाटस रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. महापूराचे पाणी एका शेतकऱ्याच्या कुकटपालन शेडमध्ये घुसल्याने तब्बल तीन हजार कोंबडीची पिल्ले मरण पावल्याने मोठे नुकसान झाले.
– ►
बारामती जिरायती भागातील कारखेल, अंजनगाव , सोनवडी सुपे, जळगाव सुपे, उंडवडी कडेपठार, उंडवडी सुपे, जराडवाडी, बऱ्हाणपूर, खराडेवाडी आदी भागात बुधवारी दिवसभर आणि रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाची सोनवडी सुपेच्या पर्जन्यमाफक यंत्रात 155 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचे अनेक कुटुंबाच्या घरात शिरल्याने प्रपंच उपयोगी साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले. कारखेल येथील शेतकरी कांतीलाल पांडुरंग भापकर यांच्या सोनवडी सुपे येथील कुकटपालन शेडमध्ये पुराचे पाणी शिरल्याने तीन हजार कोंबडीची पिल्ले मरण पावली. भापकर यांनी पिल्ले वाचविण्याचा मोठा प्रयत्न केला. मात्र वीज गेलेली असल्याने अंधारात अवघी पन्नास पिल्ले वाचविण्यात यश आले. तसेच कोंबड्याचे खाद्य भिजल्याने खराब झाल्याने मोठे नुकसान झाले.
गेल्या महिन्यात 6 तारखेला मुसळधार झालेल्या पावसानंतर बुधवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बारामती – पाटस रस्त्यावरील उंडवडी कडेपठारच्या हद्दीतील लेंडीच्या ओढ्याला व उंडवडी सुपेतील स्टॅंडजवळील ओढ्याला महापूर आला होता. त्यामुळे दुचाकीसह चारचाकी व जड वाहनांची वाहतूक रात्रभर बंद झाली होती. तसेच अंजनगाव, जळगाव सुपे , कऱ्हावागज व जळगाव कप हद्दीतून कऱ्हानदीला महापूर आला आहे. त्यामुळे नदी दुथडी भरुन वाहत आहे. सोनवडी-कारखेल ओढ्याला महापूर आल्यामुळे अंजनगाव – उंडवडी सुपे रस्त्यावरील सोनवडी सुपे येथील पूलावरुन पाणी वाहिल्याने पूल खचला असून अर्धा रस्ता वाहून गेला आहे.
तलाठी नॉट रिचेबल..सोनवडी सुपे येथील शेतकरी भापकर यांच्या कुकटपालनच्या शेडमधील पिल्ले मरण पावल्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यासाठी दिवसभर उंडवडी कपच्या गावकामगार तलाठी यांना संपर्क करत होते. मात्र त्यांचा फोन दिवसभर फोन नॉट रिचेबल किंवा स्वीच ऑफ सांगत होता. त्यामुळे भापकर यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे भापकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.