June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कोरोणा करतोय मेंदुवर हल्ला,ब-या झालेल्या रुग्णांमध्ये असा दिसतोय परिणाम

लंडन, : कोरोनाच्या (coronavirus) आजारातून रुग्ण मोठ्या संख्येनं बरे होताना दिसत आहेत. पण त्यानंतर या रुग्णांना विविध आजारांना तोंड द्यावं लागत आहे. सध्या कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना मेंदूच्या समस्या निर्माण होत असल्याचं नवीन संशोधनातून समोर आलं आहे. त्याचबरोबर मेंदूचं इन्फेक्शन होत असून ज्या रुग्णाला सर्वात गंभीर संसर्ग झाला आहे त्याचा मेंदू 10 वर्षांनी म्हातारा होत असल्याचं संशोधनात निदर्शनास आलं आहे.

Advertisement

लंडनमधील इंपिरिअल कॉलेजच्या संशोधकांनी कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांचा अभ्यास केला. कोरोनातून रुग्ण बरा झाल्यानंतर देखील त्यांच्या मेंदूला पोहोचलेली हानी कायम राहत असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला.

कोरोनातून जे रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळून येत नाहीत त्या रुग्णांना देखील ही समस्या होत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

डॉक्टर अॅडम हॅम्पशायर हॅम्पशायर यांच्या टीमने एकूण 84,285 लोकांचा अभ्यास केला आहे. Great British Intelligence Test असं याला नाव देण्यात आलं आहे. सध्या यातील निष्कर्ष जाणकारांनी तपासायचा असून Med Rxiv या ऑनलाईन वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या मेंदूवर इन्फेक्शन होण्याचं प्रमाण बरंच मोठं असून, जे कोव्हिड-19 मुळे रुग्णालयात दाखल होते त्यांच्यावर तर हा परिणाम जास्त जाणवत आहे. 20 ते 70 वयोगटातील जागतिक पातळीवरच्या डाटामध्ये ज्यांच्या मेंदूवर कोरोनाच्या संसर्गाचा खूप गंभीर परिणाम झाला आहे त्यांचा मेंदू 10 वर्षांनी म्हातारा झाला आहे, म्हणजे 30 वर्षांच्या व्यक्तीचा मेंदू 40 वर्षांच्या व्यक्तीच्या मेंदूसारखा काम करत आहे असं हे संशोधन करणाऱ्यांचं मत आहे. या संशोधनात प्रत्यक्ष शास्रज्ञांचा सहभाग नसल्याने ते निष्कर्ष काळजीपूर्वक तपासायला हवेत असंही तज्ज्ञांचं मत आहे.

एडिनबर्ग विद्यापीठातील प्रोफेसर जोआना वॉर्डलॉ यांच्या मते, ज्यांचा अभ्यास करण्यात आला आहे त्यांच्या मेंदूची कोव्हिड आधीची स्थिती माहीत नव्हती आणि होणारे परिणाम दीर्घकाळ टिकत नाहीत.

त्याचबरोबर या रिपोर्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लंडन विद्यापीठातील मेडिकल सायन्सचे प्रोफेसर डेरेक हिल यांनी हा निष्कर्ष बरोबर नसल्याचं म्हटलं आहे. हिल म्हणाले, “सहभागी झालेल्या नागरिकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह होतीच याचा पुरावा उपलब्ध नाही. अनेकांनी तोंडानी नुसतंच सांगितलं आहे की मला कोरोना झाला होता. या रुग्णांची आधीची स्थिती आणि नंतरची स्थिती याचा तुलनात्मक अभ्यास केलेला नाही त्यामुळे त्याची सत्यता विश्वासार्ह नाही”

“कोव्हिडचा दीर्घकालीन परिणाम चांगल्या प्रकारे समजून घेणं आणि कोरोनाच्या संसर्गाच्या काही आठवडे व महिन्यांत किती परिणाम होतो हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर मेंदूच्या कार्यात कायमस्वरुपी नुकसान होते की काय हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे”, असंही हिल म्हणाले.

Leave a Reply