कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा ईषारा
पुणे – बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी तिव्रतेच्या वादळाची तीव्रता कमी झाली आहे. महाराष्ट्राचा दक्षिण भाग आणि उत्तर कर्नाटककडून अरबी समुद्राकडे सरकले आहे. दरम्यान अरबी समुद्राच्या पश्चिममध्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. गुरुवारी (१५ ऑक्टोबर) कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी तिव्रतेचे चक्रीवादळ आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्यावरून जमिनीवरून उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्राच्या भागावरून अरबी समुद्राकडे गेले आहे.
त्यामुळे राज्यातही काही प्रमाणात वेगाने वादळी वारे वाहत होते. उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा परिसरातील पश्चिम उत्तर भागात ताशी १३० किलोमीटर वेगाने तर तेलंगणातील हैदराबाद पश्चिम भागात ताशी ५० किलोमीटर वेगाने वारे होते.
गुरूवारी गुजरातच्या दक्षिण भाग, उत्तर कोकण आणि अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होणार आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार आणि अतिवृष्टी होईल.