काळे बाळ होईल म्हणून ब्रिटनच्या शाही कुटुंबाने प्रिन्स पदवी नाकारली
वॉशिंग्टन :
मला होणार असलेले बाळ काळ्या रंगाचे निपजू शकते, अशी भीती सर्वांना होती. यातूनच ब्रिटनच्या शाही कुटुंबाचा आमच्याबद्दलचा द़ृष्टिकोन नकारात्मक बनला, असा आरोप ब्रिटनचे प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेगन मर्केल यांनी केला आहे. ब्रिटनच्या शाही परिवारावर वर्णभेदाचा गंभीर आरोप झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.
प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल यांनी प्रसिद्ध टी.व्ही. पत्रकार ऑप्रा विनफ्रे यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले. आमचा मुलगा आर्ची याला प्रिन्स जाहीर करणे शाही परिवाराला जड जात होते. कारण, त्याच्या जन्मापूर्वी तो काळ्या रंगाचा निपजू शकतो, अशी भीती या परिवाराला होती.
आर्चीच्या जन्मापूर्वी शाही परिवाराने प्रिन्स हॅरी यांच्याशी याबद्दल चर्चाही केली होती. हॅरी यांना ते सगळे ऐकणेही जीवावर आलेले होते. तभापि, मेगन यांनी अशी भीती व्यक्त करणार्या शाही कुटुंबातील सदस्याचे नाव जाहीर केलेले नाही. राजघराण्याशी संबंध आल्यानंतर माझ्या वैयक्तिक जीवनातले स्वातंत्र्यही संपुष्टात आले होते, असेही मेगन यांनी सांगितले.
गतवर्षी सोडल्या शाही पदव्या
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा पणतू हॅरी आणि मेगन यांनी गतवर्षी मार्च महिन्यात ‘फ्रंटलाईन रॉयल ड्युटी’ला सोडचिठ्ठी दिली होती. शाही दाम्पत्याने अनुक्रमे ‘ड्यूक ऑफ ससेक्स’ आणि ‘डचेस ऑफ ससेक्स’ या शाही पदवीला सोडचिठ्ठी दिली होती. आता दोघे कॅलिफॉर्नियात राहतात.