बापरे..बार्शी तालुक्यातील मुंगशी येथे विहिरीत पडला जेसीबी
वैराग:
मृग नत्राने बार्शी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे . गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षीही मुसळधार व भरपूर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . अतीवृष्टी चा फटका गतवर्षी संपूर्ण बार्शी तालुक्याने अनुभवला आहे . यंदाही तसाच फटका बसतोय की काय याची लोकांच्या मनात भिती असतानाच बार्शी तालुक्यातील मुंगशी वा येथे शनिवारी दि. १२ रोजी रात्रीच्या दरम्यान पावसामुळे कच्च्या रस्त्यावरून जेसीबी विहिरीत पडला आहे. सुदैवाने जिवित हाणी झालेली नसली तरी दोघे जखमी झाले आहेत.
Shocking..JCB fell into a well at Mungshi in Barshi taluka
याबाबत सविस्तर असे की ,मुंगशी ते कळमण रस्ता कच्चा असून पावसामुळे निसरडा बनला आहे . शनवारी १२ रोजी मुंगशी शिवारातील शेतकर्याच्या पाईपलाईन खोदाईचे काम करून जेसीबी गावाकडे परत जात असताना रात्री ८ ते ९ वा .दरम्यान निसरड्या रस्त्यामुळे रस्त्यालगतच्या विहिरीत तो पडला .यामध्ये जेसीबी मालक – लक्ष्मण अशोक क्षिरसागर (रा.मुंगशी ) व चालक सोमनाथ माळी (रा. कौठाळी ) दोघेही किरकोळ जखमी झाले असून.नशिब बलवत्तर असल्यामुळे ते वाचले .
पर्यायी पक्का रस्ताच नाही
नागझरी नदीतून हा रस्ता कौठाळी- कळमण मार्गे -सोलापूर शहराला जातो . मात्र नदी पात्र कोरडे असतानाच याचा उपयोग होतो ,पावसाळ्यात उपयोग होत नाही .शेतकऱ्यांना व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना ये-जा करण्यासाठी पर्यायी पक्का रस्ता नसल्यानेच सदर दुर्घटना घडली आहे.
नागझरी नदीवरील बंधार्याच्या अर्धवट कामाचा बसला फटका
मुंगशी जवळील नागझरी नदीवरील बंधार्याचे काम गत चार वर्षापासून सरकारच्या लालफितीत अडकून पडलेले आहे. त्यामुळे हा बंधारा अर्धवट स्थितीतच आहे . या मार्गावर प्रवासी व माल वाहणार्या वाहनांची संख्या जास्त आहे.
याच मार्गावरून पुढे मुंगशी, दहिटणे , तडवळे , ढोराळे, आदी गावांचे प्रवासी सोलापूरला जाण्यासाठी मधला शॉर्टकट मार्ग म्हणून निवडतात त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच रहदारी मोठ्या प्रमाणात असते .
पर्यायी पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने व अर्धवट बंधाऱ्याच्या कामामुळे गेल्या वर्षी मुंगशी येथील चार-पाच शेतकरी नदीपात्रात अडकलेलेही होते. एक शेतकरी नदी प्रवाहात वाहून गेला होता. त्यामुळे शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी असे मुंगशीतील ग्रामस्थांची मागणी आहे .
गेल्या चार पाच वर्षापासून प्रशासनाच्या लालफितीत बंधाऱ्याचे काम अडकले असून शासनाने याकडे लक्ष न दिल्यामुळे रखडले आहे . ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करून देखील योग्य तो मार्ग निघालेला नाही . तरी शासनाने त्वरित बंधाऱ्याचे अर्धवट काम पूर्ण करावे अशी मागणी जोर धरत आहे.