December 3, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीतील 17 व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन…..     

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे आणि कवी फुलचंद नागटिळक प्रतिष्ठान, खैराव यांच्या वतीने बार्शी येथील कै.यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवनात दि 13 व 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 17 व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन, संमेलनाचे निमंत्रक डॉ. बी. वाय. यादव यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.     

Advertisement
 

याप्रसंगी संमेलनाचे आयोजक कवी फुलचंद नागटिळक, कार्यवाह महारुद्र जाधव, छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष धिरज शेळके, ह. भ. प. विलास जगदाळे,अॅड. अनिल पाटील, लेखक प्रकाश गव्हाणे, मेजर श्रीमंत बांगर, कवी बालाजी जाधवर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या संमेलनस्थळाला कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे साहित्य नगरी नाव दिले असल्याचे संमेलनाचे आयोजक फुलचंद नागटिळक यांनी आपल्या मनोगतात म्हटले. बार्शी सारख्या ग्रामीण भागात होत असलेले 17 वे अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन बार्शीकरांसाठी एक खूप मोठी पर्वणी असून बार्शी शहर आणि परिसरातील साहित्यिकांसाठी एक सुवर्णसंधी मिळालेली आहे. बार्शी तालुक्याला सुरुवातीपासूनच साहित्यिकांचा वारसा लाभलेला असून आत्तापर्यंत बार्शीच्या अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून भारताच्या इतिहासात बार्शीचे नाव कोरलेले आहे. या संमेलन सोहळ्यामध्ये ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित डिसले आणि आदर्श उद्योजक आणि समाजसेवक रामचंद्र पवार यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
    बार्शी पंचक्रोशीतील विविध क्षेत्रात यश संपादन करून  कार्यरत असलेल्या व्यक्तींचा सामाजिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. तरी बार्शी तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील जास्तीतजास्त साहित्यिकांनी आणि साहित्य प्रेमींनी या संमेलनात सहभागी होऊन सुवर्ण क्षणाचा साक्षिदार होण्याचे आवाहन संमेलनाचे निमंत्रक डॉ. बी. वाय. यादव यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन महारुद्र जाधव यांनी केले तर आभार धिरज शेळके यांनी मानले.

Leave a Reply