बार्शीतील मिल सुरू करण्याची संसदेत मागणी

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज
आमदार राजेंद्र राऊत यांच्या मागणीनुसार माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी संसदेत बार्शी टेक्सटाईल मिल सुरू करण्याची मागणी केली. खासदार नाईक-निंबाळकर यांनी कोरोना कालावधीच्या लॉकडाऊन काळापासून बंद असलेली बार्शी शहरातील बार्शी टेक्सटाईल मिल पुन्हा सुरू करून त्यावर अवलंबून असलेल्या 450 कामगारांच्या कुटुंबाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी संसदेमध्ये केली.
यापूर्वी आ. राजेंद्र राऊत यांनी गेली नऊ ते दहा महिन्यांपासून बंद असलेली बार्शी शहरातील बार्शी टेक्सटाईल मिल पुन्हा सुरू करून लॉकडाऊन काळापासून अडचणीत सापडलेल्या 450 कामगारांच्या कुटुंबाच्या रोजी-रोटीचा विचार करून त्यांनी वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे दोन वेळेस पत्रव्यवहार व ई-मेल द्वारे मिल सुरू करण्याची मागणी केली होती. याच अनुषंगाने आमदार राजेंद्र राऊत यांच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून निंबाळकर यांनी बार्शीतील कामगारांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न संसदेमध्ये मांडला. याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांचे फोनवरून आभार व्यक्त केले. यावेळी रणजीतसिंह निंबाळकर म्हणाले की लवकरच बंद असलेली मिल सुरू करण्याचे आश्वासन आपल्यास सरकारकडून मिळाले आहे.