May 20, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज

      कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे संस्थापित श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी जि. सोलापूर येथे मंगळवार दिनांक १८ मे २०२१ रोजी एक दिवसीय ऑनलाइन  आंतरराष्ट्रीय परिषदेचे  यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेचा  मुख्य विषय ” जागतिक दृष्टिकोनातून २१ व्या शतकातील संशोधने ”   असा होता.

Advertisement

कोव्हीड १९ यामुळे दैनंदिन मानवी जीवनात आमूलाग्र बदल होत आहेत. पारंपारिक जीवन प्रणाली ढासळली आहे. मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रात बदल झाल्याचे दिसून येत आहे. यांस आरोग्य व शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन शिक्षण प्रणाली स्वीकारली जात आहे.  वर्क फ्रॉम होम च्या माध्यमातून शैक्षणिक कार्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.  तंत्रज्ञान आत्मसात करून प्रत्येक जण स्वतःला बदलू पाहत आहे. एकंदरीत शिक्षण प्रणालीतील विविध टप्प्यावर डिजिटल प्रणाली कार्यरत झाली आहे.  यातूनच अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन, प्रशिक्षण यांचे स्वरूप बदलत आहे. याचे शिक्षक, विद्यार्थी, पालक , समाज यांनी स्वागत केले आहे. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाने वर्क फ्रॉम होम द्वारे ऑनलाईन शिक्षण प्रणाली देखील राबविली आहे. याचा
बी एड, बी पी एड, एम एड, एम पी एड, पीएच डी विध्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.

म्हणूनच २१ व्या शतकातील नाविन्यपूर्ण संशोधन प्रणाली विकसित करून जागतिक पातळीवर शिक्षण व सामाजिक क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या हेतुने या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेचा उदघाटन कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मा. डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.  कार्यक्रमाचे अध्यक्ष  म्हणून डॉ बी वाय यादव हे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस गोरे व प्राचार्य डॉ चंद्रकांत मोरे  आदि मान्यवर उपस्थित होते.

कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी जागतिक दृष्टिकोनातून २१ व्या शतकातील संशोधने यावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी संशोधनाची मूलभूत संकल्पना मांडली. संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधनाचे पैलू विशद केले.संशोधन प्रकार, संशोधन अभिकल्प, संशोधन समस्येचे स्रोत, विश्लेषण व अर्थनिर्वचन आदी घटकांवर सविस्तर चर्चा केली. समाजातील प्रचलित गरजा व समस्यांवर आधारित २१ व्या शतकातील संशोधने झाली पाहिजेत असे त्यांनी आवाहन केले. 

डॉ बी वाय यादव यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविले जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती सांगितली. जगदाळे मामा हॉस्पिटलच्या ट्रामा सेंटरची भूमिका विशद केली. कोव्हीड१९ कालावधीत जगदाळे मामा हॉस्पिटलच्या माध्यमातून उत्कृष्ठ काम सुरू असल्याचे सांगितले. ऑनलाईन शिक्षण प्रणालीतून विद्यार्थ्यांना अध्ययनाची मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली आहे.  २१ व्या शतकातील संशोधने सामाजिक आशयाची जाण आणि  नैतिक विचारसरणीवर आधारित असावीत असे  त्यांनी प्रतिपादन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस गोरे यांनी ऑनलाईन परिषदेस उपस्थित असलेल्यांचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण उपक्रमांची माहिती दिली. समाज व राष्ट्र विकासात शिक्षक शिक्षण अभ्यासक्रम महत्वाचा आहे. म्हणूनच २१ व्या शतकातील संशोधने ही शिक्षक शिक्षण क्षेत्राला गतिमानता देणारी असावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

परिषदेच्या दुसऱ्या सत्रात साधन व्यक्ती म्हणून अमेरिकेतील प्रोफेसर डॉ अनिलकुमार भाटे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी जागतिक दर्जाचे संशोधन महत्वाचे असल्याचे सांगितले. २१ व्या शतकात स्पर्धेत मोठया प्रमाणात वाढ अपेक्षित आहे. विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, उद्योगधंदे आणि शासन यांच्यात  ज्ञान संक्रमण गरजेचे आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात ज्ञान संक्रमण आवश्यक आहे. अमेरिका तंत्रज्ञान तर भारत सांस्कृतिक मूल्ये यात योगदान देऊ शकतात असे त्यांनी सांगितले.

अमेरिकेतील जागतिक बँक वॉशिंग्टनचे डॉ रमेश देशपांडे यांनी जागतिक पातळीवर संशोधन गरजेचे असल्याचे सांगितले. त्यांनी शाश्वत विकास ही संकल्पना सविस्तर विशद केली.  कोव्हीड१९ मुळे विकासाची गती खुंटली आहे. जागतिक समस्या निर्माण होत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठांनी निश्चित कृति योजना तयार करून शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी बहु- विद्याशाखीय  कौशल्य विकास,  संशोधन आणि नाविन्यता यांवर भर दिला पाहिजे असे त्यांनी आवाहन केले.

अमेरिकेतील डॉ विक्रम पत्तरकिने यांनी ‘इको व्हिलेज- शाश्वत  पर्यावरणाकडे’ या विषयावर मार्गदर्शन केले.  त्यांनी इको व्हिलेज, मूलभूत तत्वे,  जागतिक लोकसंख्या, निसर्गाचा इशारा,  इको व्हिलेज वैशिष्ट्ये आदी घटकांवर सविस्तर मार्गदर्शन केले. पर्यावरण संतुलन राखणे गरजेचे आहे. भविष्यातील मानवी जीवनाचा विकास हा पर्यावरणावर आधारित आहे. म्हणूनच जगभरात इको व्हिलेज संकल्पना रुजविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले  पाहिजेत असे आवाहन केले.

यावेळी प्राचार्य डॉ एस बी क्षीरसागर यांनी संशोधन ओळख यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

परिषदेच्या पुढील सत्रात संशोधन पेपर सादरीकरण घेण्यात आले . एकूण २० संशोधन पेपरचे सादरीकरण झाले. यावेळी   एकूण ०४ उत्कृष्ठ संशोधन पेपर निवडण्यात आले. यासाठी तज्ञ म्हणून सौदे अरेबिया येथील डॉ कौकब अझीम, हरियाणा येथील डॉ सारिका शर्मा, सांगलीचे डॉ बी पी मरजे व मुंबई येथील डॉ सुनिता मग्रे यांनी संशोधन पेपरचे  मूल्यांकन केले.

परिषदेच्या समारोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष श्री नंदन जगदाळे हे उपस्थित होते. यावेळी  सौदी अरेबियाचे डॉ कौकब अझीम यांनी मार्गदर्शन केले.  संस्थेचे उपाध्यक्ष श्री नंदन जगदाळे यांनी आपल्या भाषणातुन महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या परिषदेचे कौतुक केले. एकूण ९० पेक्षा अधिक संशोधन पेपर संकलन झाल्याचे त्यांनी सांगितले. २१ व्या शतकातील विद्यार्थी व शिक्षक यांनी कौशल्याधिष्टीत शिक्षण प्रणाली राबवावी. अशा शिक्षण प्रणालीचा समाजाला उपयोग झाला  पाहिजे. शिक्षणातून समाजोपयोगीता जोपासली पाहिजे असे त्यांनी आवाहन केले.

सदर परिषदेत जगभरातून तसेच देशातील विविध विद्यापीठातील  शिक्षणतज्ञ, प्राध्यापक, शिक्षक, संशोधन विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला. परिषदेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस गोरे, आय क्यु ए सी समन्वयक प्रोफेसर डॉ व्ही पी शिखरे, समन्वयक डॉ एस डी भिलेगावकर, सह समन्वयक डॉ आर ए फुरडे व   प्रा. पी. पी. नरळे तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Successful organization of online international conference at Barshi College of Education

Leave a Reply