सोलापुरात लाॅकडाऊन नाही, पण कडक निर्बंध; पालकमंत्री भरणे

सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील 11 दिवसांत कोरोनाचे 721 नवे रुग्ण आढळले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे सोलापूर शहरात 394 नवे रुग्ण आढळले असून दहा जणांचा मृत्यू झाला आहे. कमी झालेला कोरोना काहीजणांच्या बेशिस्तपणामुळे पुन्हा वाढू लागला असून त्याअनुषंगाने सोमवारी (ता. 15) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका, पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर गुरुवारी (ता. 18) पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील निर्बंधाचे निकष निश्चित केले जाणार आहेत.
ठळक बाबी…
- जिल्ह्यात 11 दिवसांत वाढले एक हजार 219 रुग्ण
- मार्च महिन्यात शहरात दहा जणांचा तर ग्रामीणमधील 12 जणांचा मृत्यू
- कडक लॉकडाउन शहर- जिल्ह्यात होणार नाही, परंतु निर्बंध कडक केले जातील : पालकमंत्री
- बेशिस्त वाहनचालकांवरील कारवाईसाठी शहर-जिल्ह्यात येणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदीची शक्यता
- सोमवारी (ता. 15) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
- गुरुवारी (ता. 18) पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे घेणार अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक
- शुक्रवारपासून (ता. 19) हॉटेल, दुकाने, प्रवासी वाहने, बिअर बार, शाळांबाबत लागू होणार कडक निर्बंध
- विवाह व अंत्यविधीसाठी 50 जणांची मर्यादा; नियम मोडणाऱ्यांवर दाखल होणार थेट गुन्हे
नागपूर, अमरावती, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये काही दिवसांचा कडक लॉकडाउन करण्यात आला आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांची परिस्थिती चिंताजनक होऊ लागली असून पुण्यात लॉकडाउन नाही, परंतु निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता सोलापूर शहर-जिल्ह्यातही कडक निर्बंध घातले जातील, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. लॉकडाउन हा कोरोनाला रोखण्याचा अंतिम उपाय नसून नागरिकांनी नियमांचे पालन काटेकोरपणे केल्यास निश्चितपणे कोरोनाविरुध्दची लढाई जिंकता येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कडक निर्बंधांबाबत सखोल चर्चा होऊन नियोजन केले जाईल. गुरुवारी (ता. 18) अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजन आणि त्या निर्बंधांच्या अंमलबजावणीच्या संदर्भातील आढावा घेऊन त्यानुसार आदेश काढले जाणार आहेत.
लॉकडाउन नाही, पण नियम पाळावेच लागतील
सोलापूर शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाउन करण्याचा सध्या कोणताही विचार नाही. कोरोना वाढणार नाही, यादृष्टीने प्रत्येकांनी ‘कुटूंब माझी जबाबदारी’ आणि माझे गाव कोरोनामुक्त गाव या मोहिमाअंतर्गत नियमांचे पालन करावे. जेणेकरून लॉकडाउनशिवाय आपण कोरोनामुक्त होऊ, असा विश्वास आहे.
– दत्तात्रय भरणे, पालकमंत्री