सोलापुरात अनोखा छंदवेडा आजोबा,300 खिळे, 50 घुंगरू, 15 किलो वजनाची चप्पल

जीवनात आनंद मिळवण्यासाठी एक तरी छंद माणसाने जोपासला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला सोलापूरच्या अशा आजोबांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या वजनदार चपलेची देशभरात हवा आहे. या वयातही हे आजोबा तब्बल 15 किलो वजनाच्या कोल्हापुरी चपला वापरतात. 300 खिळे, 50 घुंगरू, दीड फुट उंचीचे नागाच्या फण्याचे डिझाईन, लाइटिंग, 400 रिबीटचे गुंफण, 12 तळी कातडे आणि 4 नट बोल्ट ही त्यांच्या चपलांची खासियत आहे. मिशांना पीळ देत या अनोख्या चपला घालून ‘कर्र… कर्र’ आवाज करत ते गावोगावी फिरतात तेव्हा त्यांचा स्वॅग पाहून आपसूकच ‘लय भारी’ ही प्रतिक्रिया समोरच्याच्या तोंडून आल्याशिवाय राहत नाही.
सोलापूरच्या सुळेवाडीतील 73 वर्षीय दाजी दोलताडे या आजोबांना पहिल्यापासूनच बांधणीच्या कोल्हापुरी चपला वापरण्याचा छंद आहे.
पुढे त्यांचा हा छंद अधिकच वाढत गेला. वजनदार कोल्हापुरी चपला वापरण्यामागची कहाणीदेखील रंजक आहे. रमेश सिप्पी यांच्या गाजलेल्या ‘शोले’ चित्रपटातील खलनायक गब्बर सिंगचे वजनदार बूट पाहून आपणदेखील वजनदार चपला वापराव्यात, अशी कल्पना त्यांना सुचली. तेव्हापासून त्यांनी आपल्या चपलांचे वजन वाढवले. दहा किलो वजनाच्या चपलांपासून त्यांनी सुरुवात केली. सध्या ते वापरत असलेल्या चपलांचे वजन तब्बल 15 किलो आहे. आकर्षक नक्षीकाम असलेला हा चपलांचा जोड बनवण्यासाठी त्यांना 25 हजार रुपये खर्च येतो. सध्या त्यांच्याकडे अशा अनोख्या चपलांचे तीन जोड आहेत. त्यांच्या या छंदाची ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने दखल घेतली आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही त्यांच्या छंदाचे कौतुक केले आहे.
तुमचं वय झालंय, आता तुम्हाला वजनदार चपलांचा त्रास होतो का, असे प्रश्न मला विचारले जातात, पण खरं सांगायचं तर मला या वजनदार चपलांची सवयच झाली आहे. मला त्याचा कसलाही त्रास होत नाही. या चपलांमुळे माझी एक वेगळी ओळख निर्माण झालीय. यापुढेही ही ओळख मी जपणार आहे. बाहेर फिरायला गेल्यानंतर लोक चपलांकडे कौतुकाने पाहतात, फोटो काढतात. माझ्यासोबत आवर्जून गप्पा मारायला येतात. एकंदरीत ‘जिथे जातो तिथे माझीच हवा’ असते,