October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सर्वाधिक फिंगर प्रिंट ‘महाराष्ट्रात

पुणे – विविध गुन्ह्यांच्या तपासामध्ये पोलिसांना मोलाची मदत करणाऱ्या अंगुली मुद्रा केंद्राकडून राज्यातील तब्बल सहा लाख ८५ हजार ६१६ गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे (फिंगर प्रिंट) संग्रहित करण्यात आले आहेत. २०१९ च्या आकडेवारीनुसार देशातील अटक व शिक्षाप्राप्त गुन्हेगारांचा अभिलेख जतन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) दिली आहे.

– 

राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींच्या दहा बोटांची अंगुलीमुद्रा पत्रिका तयार करून ती अंगुली मुद्रा केंद्रामध्ये पूर्व गुन्हेगार पार्श्‍वभूमी तपासणीसाठी पाठवली जाते.

संबंधित आरोपीची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असेल तर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, पोलिस कोठडी मिळविण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो. त्याचबरोबर तडीपार, फरारी संशयित आरोपीबाबतची माहिती संबंधित पोलिस ठाण्यालाही कळविली जाते.

दरम्यान, राज्य सरकारने अंगुली मुद्रा विभागाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ‘ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टीफिकेशन सिस्टिम (एएमबीआयस) ही संगणकीय प्रणाली खरेदी केली आहे. त्याची अंमलबजावणी प्रक्रिया अंतिम टप्यात आहे.

या प्रणालीमध्ये शिक्षा झालेल्या व अटक आरोपींच्या दहा बोटांच्या ठशांसह, हाताचा पंजा, फोटो, डोळ्यांचा (आयरिस डाटा) माहिती संग्रहित केलेली आहे. ही प्रणाली २४ तास कार्यरत राहणार असून गुन्हेगारांच्या गुन्ह्यांचा तपशील अतिशय कमी वेळेत पोलिसांना उपलब्ध होऊन गंभीर गुन्हे उघडकीस येण्यास मदत होणार आहे.

असे आहे अंगुलीमुद्रा विभागाचे काम
अंगुलीमुद्राशास्त्र हे व्यक्तीची ओळख पटविण्याचे शास्त्र आहे. त्याद्वारे जिवंत व मृत व्यक्तीची ओळख पटविता येते. न्यायालयीन प्रकरणामध्ये याचा उपयोग होतो. महाराष्ट्रामध्ये राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आधिपत्याखाली अंगुलीमुद्रा केंद्र कार्यरत आहे. अंगुलीमुद्रा विभागाचे मुख्य कार्यालय पुणे येथे असून मुंबई, नागपूर व औरंगाबाद येथे तीन विभागीय कार्यालये, तसेच ४२ जिल्हा पोलिस घटकामध्ये जिल्हा कार्यालये आहेत.

मागील वर्षे ४३०९ जणांवर कारवाई
२०१९ मध्ये दोन लाख ३६ हजार १२२ आरोपींच्या बोटांच्या ठशांच्या शोधपत्रिकांद्वारे पूर्व शिक्षेचा तपशील तपासण्यात आला. त्यापैकी ४३०९ जणांची माहिती पोलिस ठाण्याला कळविण्यात आली. त्यामुळे संबंधित आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे पोलिसांना सोपे गेले.

Leave a Reply