March 30, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

“सर्जनशील व्यक्तिमत्त्व : डॉ बी वाय यादव ”  ग्रंथाचे प्रकाशन

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या  संस्थेचे  विद्यमान अध्यक्ष मा डॉ बी वाय यादव यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्राचार्य डॉ एस एस गोरे यांनी संपादित केलेल्या ” सर्जनशील व्यक्तिमत्त्व: डॉ बी वाय यादव ” या ग्रंथाचे प्रकाशन  संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा श्री विष्णू पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. येथील  शिक्षणशास्त्र महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा डॉ बी वाय यादव, जनरल सेक्रेटरी मा श्री विष्णू पाटील, विश्वस्त मा प्राचार्य डॉ चंद्रकांत मोरे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस गोरे, बी पी एड विभागप्रमुख डॉ सुरेश लांडगे, एम पी एड विभागप्रमुख प्रा जी एस फडतरे, प्रा बी टी गुंड आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

श्री क्षेत्र भगवंत आणि कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या पवित्र भूमीत शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात विधायक व सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे एक महान धन्वंतरी म्हणून डॉ बी वाय यादव यांचा उल्लेख केला जातो. सामाजिक जीवनात मानवतावादाची जोपासना करत त्यागी व समर्पित भावाने जीवन जगणारे डॉ यादव हे एक महान ध्येयवादी आहेत. ते रुग्णसेवेचा मानदंड जपणारे थोर धन्वंतरी आहेत. कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्रांतीचा विचार वारसा आपल्या कृतिशील जीवन कार्यातून प्रगतीपथावर नेणाऱ्या डॉ यादव यांची स्फूर्तीगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

या ग्रंथामध्ये प्राचार्य डॉ सुनीलकुमार लवटे ( बार्शीभूषण: डॉ बी वाय यादव), संस्थेचे विश्वस्त प्राचार्य व न इंगळे ( गुरुभक्तीचा गौरवशाली गौरीशंकर ), संस्थेचे विश्वस्त प्राचार्य डॉ चंद्रकांत मोरे ( आमच्या संस्थेचे कर्णधार : डॉ  बबन यशवंत यादव ), प्राचार्य डॉ एस एस गोरे ( एक सर्जनशील धन्वंतरी : डॉ बी वाय यादव )  अशा प्रकारे लेखनाची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. या ग्रंथात डॉ यादव यांच्या कार्याचा आढावा घेणारी छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी डॉ यादव यांचा कार्यगौरव  केलेली भावविधाने आहेत. डॉ यादव यांचे कार्य व पुरस्कार यांची देखील सविस्तर माहिती यात देण्यात आली आहे. म्हणूनच  तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी असलेला हा एक दुर्मिळ ग्रंथ आहे. साई प्रिंटिंग प्रेसचे संचालक श्री गिरीश सोनार यांनी अत्यंत कमी कालावधीत आकर्षक व सुबक असा हा ग्रंथ तयार केला आहे.

डॉ यादव यांनी हा ग्रंथ प्रकाशित केलेल्या लेखकांचे आभार व्यक्त केले. तसेच जगदाळे मामा हॉस्पिटल येथील ट्रामा सेंटर उभारणीसाठी सर्वानी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन केले.

ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी, शेतकरी व गरजू रुग्णांसाठी सेवा करणारे डॉ यादव हे एक भूतलावरील देवदूत आहेत. रुग्णांसाठी वैद्यकीय कुशलता पणाला लावणारे डॉ यादव हे एक निष्णात सर्जन आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये ट्रामा सेंटर  उभारले जात आहे.  सर्वसामान्य परिस्थितीतून असामान्य व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी हा ग्रंथ अनेकांना प्रेरणादायी आहे. म्हणूनच हा ग्रंथ प्रकाशित केल्याचे संपादक प्राचार्य डॉ एस एस गोरे यांनी सांगितले.
  या ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमास  प्राध्यापक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply