समाजाचे ऐकणे हे पत्रकारितेचे काम : डॉ. लवटे वायकुळे यांच्या ‘पत्रकारितेचा शोध आणि बोध पुस्तकाचे प्रकाशन

बार्शी ;
नितीमुल्यांवर अधारीत पत्रकारितेचा नेहमीच गौरव होत आला आहे. असेच काम करणा-या माणसेही समाजासाठी काही तरी करू शकतात, असे सांगून समाजातील घडणा-या घटना, घडामोडी वृत्तपत्रात नेहमीच येत राहिल्या आहेत. याहीपुढे समाजाचे ऐकणे हे पत्रकारितेचे काम राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात पद्मश्री ग.गो. जाधव पत्रकारिता व जनसंवाद विभागातर्फे सचिन वायकुळे लिखित ‘पत्रकारिता शोध आणि बोध या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. लवटे व पत्रकार सम्राट फडणीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कोल्हापूर महापालिकेचे उपायुक्त विनायक औंधकर, जाधव अध्यासनचे समन्वक डॉ. शिवाजी जाधव व भाग्यश्री प्रकाशनाच्या भाग्यश्री कासोटे-पाटील व लेखक वायकुळे उपस्थित होते.
नितीमुल्य जपत पत्रकारिता करणारे अनेक पत्रकार आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत अशी अनेक नावे सांगता येतील. लोकव्यवहाराचा महत्त्वाचा पैलू पत्रकारितेला आणखी लोकापर्यंत घेऊन जाईन. लेखक सचिन वायकुळे यांनी समाजातील वंचितांवर लेखन करून त्यांच्यासाठी काम करत नितीमुल्यांची जपणूक करण्याचाच प्रयत्न केला आहे, असेही डॉ. लवटे म्हणाले.
माध्यमांनी विश्वासार्हता टिकवून बदल स्विकारले तरच पत्रकारितेला नवी दिशा मिळेल. झपाट्याने बदलत चाललेले तंत्रज्ञान माध्यमांनीही जाणून घेतले पाहिजे, असे ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस म्हणाले.
कार्यक्रमासाठी डॉ. रत्नाकर पंडित, आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, प्रा. डॉ. रणधीर शिंदे, प्रा. नंदकुमार मोरे, डॉ. सुमेधा साळुंखे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. ओंकार हिंगमिरे यांनी आभार मानले.