October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

बार्शी :
बार्शीतील शिक्षणशास्त्र महाविद्यालय  महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना ,  व अग्नि कुल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिन  साजरा करण्यात आला.यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आंतर विद्याशाखीय अभ्यासचे  प्रभारी अधिष्ठाता  तथा महाविद्यालयातील प्रा. डॉ. व्ही. पी. शिखरे हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.  अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुग्रीव गोरे हे होते.

Advertisement

प्रास्ताविक डॉ. एम. व्ही. मते यांनी केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वनिमुद्रित  विज्ञान गीत  सर्वांनी श्रवण केले. बी एड प्रशिक्षणार्थी योगिता झाडे यांनी पॉवर पॉईंट द्वारे राष्ट्रीय विज्ञान दिन याविषयी माहिती  प्रभावीपणे सादर केली.

कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. व्ही. पी. शिखरे यांनी उत्तम प्रकारे  विवेचन केले. त्यांच्या व्याख्यानाचा मुख्य विषय २१ व्या शतकातील वैज्ञानिक जीवन असा होता. त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन संदर्भात संकल्पना व  पार्श्वभूमी  आदि घटकांची सविस्तर माहिती दिली.  आज प्रत्येकजण भौतिक सुखाच्या मागे लागला आहे. विज्ञानाचा भौतिक जीवनाशी संबंध जोडला जात आहे. भौतिक समृद्धीबरोबर निसर्गाचे संरक्षण व संवर्धन गरजेचे आहे. विवेकी विचार जीवनप्रणाली आत्मसात करणे आवश्यक आहे. विवेक व विज्ञान यातून अध्यात्मवाद जोपासला पाहिजे. विज्ञानाने मानवी जीवनात क्रांतिकारी बदल होत आहेत. आयुर्वेदासंबंधी सकारात्मक दृष्टिकोन विकसित होत आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला गेला आहे. विज्ञानाचे सामर्थ्य ओळखले जात आहे. राष्ट्रीय संपत्ती म्हणजे मानवी ऊर्जेचा स्रोत निर्माण करणे होय. स्वच्छता, वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा, चिकित्सक वृत्ती, लैंगिक समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, मूल्याधिष्ठित वर्तन आदि बाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. विवेकी व सृजनशील माणूस घडविण्यात विज्ञानाचे मोठे योगदान आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देतो. राष्ट्राचे भविष्य हे त्या राष्ट्रातील बालकांवर अवलंबून आहे. म्हणूनच   उदयोन्मुख शिक्षकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुग्रीव गोरे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन विषयी माहिती विशद केली.  राष्ट्राच्या विकसनात वैज्ञानिकांचे  योगदान उल्लेखनीय आहे.  वैज्ञानिक दृष्टिकोन संवर्धित व  जतन करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वपूर्ण आहे. मानवी मूल्ये  व विज्ञान यांचा संबंध महत्वपूर्ण आहे. कोरोना महामारीत सर्वांनीच  शारीरिक व मानसिक सामर्थ्य विकसन केले पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार अपेक्षा पवार  यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षाराणी  मेंडगुळे यांनी केले. 

Leave a Reply