शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

बार्शी ;
शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी येथे मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना , विशाखा वाङमय मंडळ व पृथ्वी कुल यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी बालसाहित्यिक फारूक काझी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुग्रीव गोरे हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. परमेश्वर पाटील यांनी केले.
डॉ. महादेव डिसले यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वनिमुद्रित मराठी भाषा गौरव गीत सर्वांनी श्रवण केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालसाहित्यिक फारूक काझी यांनी उत्तम प्रकारे बालसाहित्य संदर्भात विवेचन केले. त्यांच्या व्याख्यानाचा मुख्य विषय बालसाहित्य आकलन आणि परिचय असा होता. त्यांनी बालसाहित्य संदर्भात संकल्पना, पार्श्वभूमी, संदर्भ साहित्य, प्रकार आदि घटकांची सविस्तर माहिती दिली. बालसाहित्याचे बाल, किशोर व कुमार असे स्तर विशद केले. मूल समजून घेण्याचा आरसा म्हणजे बालसाहित्य होय. बालसाहित्य हे बालकांचे विश्व अधिक समृद्ध करते. बालकांच्या व्यक्तिमत्वाला आकार देते. सुसंस्कृत व सृजनशील वाचक घडविण्यात बालसाहित्याचे मोठे योगदान आहे. बालसाहित्य प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देते. राष्ट्राचे भविष्य हे त्या राष्ट्रातील बालकांवर अवलंबून आहे. म्हणूनच बालसाहित्य आकलन व परीचय करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुग्रीव गोरे यांनी मराठी भाषा गौरव दिन विषयी माहिती विशद केली. राष्ट्राच्या विकसनात साहित्यिकांचे योगदान उल्लेखनीय आहे. मराठी भाषा प्रचार, प्रसार व जतन करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वपूर्ण आहे. मराठी साहित्यातून विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक सामर्थ्य विकसन केले पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण केले. कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार डॉ महादेव मते यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक डॉ महादेव डिसले यांनी केले. रेणुका सुर्यवंशी यांनी कार्यक्रमावर आधारित पॉवर पॉईंट सादरीकरण केले.