October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

वाझे प्रकरणात नाव आलेले वरूण सरदेसाई आदित्य ठाकरेंचे कोण?

मुंबई :

दिशा सालियान, सुशांत सिंग रजपूत आत्महत्याप्रकरण आणि अलिकडच्या काही दिवसांत महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणातील प्रत्येक आरोपाचे बाण हे मातोश्रीतील ठाकरे कुटुंबांपर्यंत जात आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानभवन परिसरात फिरणारा सरदेसाई आहे कोण? तसेच वाझे प्रकरणात वरुण सरदेसाईंचा सीडीआर तपासावा,अशी मागणी करत पुन्हा एकदा बाण सोडला आहे. सरकारी बैठकांमध्ये दिसणारे हे सरदेसाई नेमके कोण आहेत? असा प्रश्न महाविकास आघाडीतील काही नेत्यांनीही केला होता.

नितेश राणेंच्या आरोपानंतर चर्चा

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्या विधानभवनातील उपस्थितीतबाबत आक्षेप घेतला.

त्यानंतर वाझे प्रकरणात नाव आल्यानंतर सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. त्यात दिलेल्या माहितीनुसार वरूण हे न्यूयार्कमधील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स ऑफ इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय असून ते त्यांना व्यवसायात मदत करतात. तसेच ते युवा सेनेचे सचिव असून आदित्य ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे वावरतात. शिवसेनेच्या आयटी सेलचे ते प्रमुख आहेत. सोशल मीडियावर ते ॲक्टिव्ह असून भाजपसह मनसेच्या अनेक नेत्यांना ते प्रत्युत्तर देत असतात. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांचे कॅम्पेनिंगही केले होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात नितेश राणे यांनी विधीमंडळात भाषण करताना वांद्र्यातील एका इमारतीत सरदेसाई यांच्या बैठका चालतात असा आरोप केला. त्यावेळी सरदेसाई यांचे नाव फारशा गांभीर्याने घेतले नाही. मात्र, मनसुख हिरेन प्रकरणात अडकलेले सचिन वाझे यांच्याशी सरदेसाई यांचे संभाषण झाल्याचा आरोप केल्यानंतर ते चर्चेत आले.

सरदेसाई रश्मी ठाकरे यांचे नातेवाईक

वरूर सरदेसाई हे युवा सेनेचे सचिव आहेत. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी करणारे ते पहिले शिवसैनिक होते. त्यानंतर वरुण चर्चेत आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांच्या बहिणीचा वरुण हा मुलगा आहे. म्हणजे ते आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ. त्यामुळे सरदेसाई यांना टार्गेट करत आरोप केले जात असल्याचे बोलले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा सहभाग होता. २०१७ मधील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक तत्पुर्वी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदेंच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर होती. विशेष म्हणजे वरुण सरदेसाई २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता होती.

सुरक्षेवरून वाद

महाविकास आघाडी सरकारने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा काढली. तर त्याचवेळी वरूण सरदेसाईंना सुरक्षा पुरविली होती. ही सुरक्षा वाय दर्जाची असल्याचा आरोप भाजपकडून होत होता. अशी सुरक्षा पुरविण्याचे कारण काय, असा प्रश्नही उपस्थित केला होता. तर आपल्याला वाय नव्हे तर एक्स दर्जाची सुरक्षा आहे. या सुरक्षेत केवळ एक कॉन्स्टेबल सोबत असतो, असा खुलासा सरदेसाई यांनी केला आहे.

बैठकांमध्ये उपस्थितीवरून नाराजी

सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांच्यासोबत शासकीय बैठकांना उपस्थित राहत होते. याला पहिला आक्षेप अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांनी घेतला. अनेक मंत्र्यांचा आक्षेप असला तरी खुलेपणाने मलिक यांनी विरोध केला. त्यानंतर त्यांचा बैठकातील सहभाग कमी झाला. त्यानंतर राणे यांनी विधीमंडळातील उपस्थितीवरूनही आक्षेप घेतला.

मनसे, भाजपशी ट्विटर वॉर

मनसे हा खंडणी मागणारा पक्ष आहे. गुगलवर टाकून पहा मग कळेल, असा आरोप वरुण यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देत मनसेच्या संदीप देशपांडे यांनी गुगलवर शिवसेना खंडणी हा शब्द सर्च केलेला स्क्रीन शॉट टाकला होता. त्यानंतर देशपांडे यांनी शिवसेनेची तुलना वीरप्पनशी करत मुंबईला लुटल्याचा आरोप केला होता. तसेच आशिष शेलार यांच्याशीही त्यांचे ट्विटर वॉर झाले होते.

गंभीर आरोपांनंतर वरुण फ्रंटवर

सोमवारी नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन बेटिंग, सचिन वाझे आणि अन्य प्रकरणांवरून वरुण सरदेसाईंवर आरोप केले. ‘गेल्या वर्षी आयपीएल खेळलं गेलं. त्या टुर्नामेंटअगोदर बेटिंगचं रॅकेट मुंबईत चालतं. काही लोक फ्लॅटमध्ये, हॉटेलमधून करतात. या सगळ्या बेटिंगवाल्यांना सचिन वाझेचे फोन जातात. आणि त्यांना सांगितलं जातं. तुम्ही जे करत आहात ते सगळं आम्हाला माहिती आहे. मग ते लोक घाबरल्यावर तुमची अटक, छापे टाळायचे असतील तर दीडशे कोटी रुपये द्या, अशी मागणी केली जायची. ती पूर्णपणे माझ्याकडे पोहोचवा किंवा मी छापे मारेन असं सांगितलं जायचं. तुमची बदनामी, अटक करू अशी धमकी दिली गेली. अशी रक्कम मागितली गेल्यावर वाझेंना एका व्यक्तीचा फोन जायचा. तू इतकी रक्कम मागितली आहेस, त्यात आमचे किती, आम्हाला किती देणार असं संभाषण केलं जायचं. ही व्यक्ती कोण? विधिमंडळात मी ज्याचं नाव घेतलं, त्याला वाय प्लस संरक्षण दिलेलं आहे, पालिकेच्या सर्व टेंडरमध्ये ज्याचं नाव आहे अशा वरुण सरदेसाईचं वाझेशी हे संभाषण झालं होतं. हा सरदेसाई कोणाचा नातेवाईक आहे, तो कोणाच्या आशीर्वादाने फोन करायचा, त्याला कोणी अधिकार दिले? ही सगळी चौकशी झाली पाहिजे. वाझेचे आणि सरदेसाईचं भाषण तपासलं पाहिजे. वरुण सरदेसाईचा सीडीआर काढा, या महिन्यात त्या दोघांत व्हॉट्सअप कॉल झाले होते का हे चौकशीतून उघड होईल.’ असे गंभीर आरोप केले गेले.

पत्रकार परिषदांचे सत्रच

राणे यांनी आरोप केल्यानंतर वरुण सरदेसाई यांनी सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन राणेंना आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले. राणे कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे, देवेद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ती माहिती विधानसभेत दिली आहे. त्यामुळे ती विधानसभेच्या कामकाजात माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यावर आरोप करू नयेत. माझे उभरते राजकीय करिअर उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी मी खुलासा करत आहे. त्यांना मी सात दिवसांची मुदत दिली आहे, जर त्यांनी आरोप सिद्ध केले नाहीत तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा दिला आहे.

मिलिंद नार्वेकरांनंतर वरुण सरदेसाई चर्चेत

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या हस्तक्षेपामुळे शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्याचा आरोप होतो. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक असलेल्या नार्वेकर यांच्यावर राज ठाकरे, नारायण राणे यांच्यासह शिवसेना सोडून गेलेल्या अनेकांनी आरोप केले. तरीही नार्वेकर यांचे मातोश्रीवरील वजन कायम होते. अनिल परब विधानपरिषदेवर आमदार झाले त्यावेळी नार्वेकरांच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे आग्रही होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी परब यांना उमेदवारी दिली आणि नार्वेकरांचा पत्ता कट झाला. तरीही पीए म्हणून वावरणाऱ्या नार्वेकर यांनी ठाकरे यांच्यासाठी चाणक्याची भूमिका बजावली. तसचे काहींसे आदित्य आणि वरूण यांच्या राजकीय संबंधांबाबत होईल का? असा तर्क बांधला जात आहे.

Leave a Reply