June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

लाॅकडाऊन पुर्वी लोकांच्या खाण्याची सोय करा ,खा ;जलील

औरंगाबाद ः फक्त चार अधिकाऱ्यांनी एसी केबीनमध्ये बसून शहरात लाॅकडाऊन लावण्याची घोषणा करू नये. जो गरीब माणूस रोज कमावून आणतो आणि त्यानंतर त्याच्या घराची चूल पेटते, त्या माणसाला तुम्हाला वाऱ्यावर सोडता येणार नाही. आधी त्यांच्या पोटापाण्याची सोय करा, मगच लाॅकडाऊनची घोषणा करा, असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले.

औरंगाबाद शहरात गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची व मृतांची संख्या झपाट्याने वाढते आहे. पोलीस, प्रशासन व आरोग्य विभागाकडून कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले जात असले तरी त्याचा फारसा उपयोग होतांना दिसत नाहीये.

दुसरीकडे प्रशासनात लाॅकडाऊन लागू करण्यावरू मतभिन्नता दिसून आली आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील लाॅकडाऊनच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. लाॅकडाऊन हा पर्याय नाही हे जरी प्रशासनाचे म्हणणे खरे असले तरी अनेकांची पोटं भरलेली आहेत. पण गरीब मजदूर, कामगार, रिक्षावाला, भाजी विक्रेता, जो रोज कमाई करतो आणि त्यानंतर आपल्या कुटुंबाचे पोट भरतो अशा लोकांचा विचार प्रशासनाने केला आहे का?

पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला बाहेर पडावेच लागते, अशावेळी तुम्ही दहा दिवसांचा लाॅकडाऊन लागू केला तर त्याने जगायचे कसे, आपल्या कुटुंबाला जगवायचे कसे? याचा आधी प्रशासनाने विचार करावा. केवळ पोलीसांच्या दंडुक्याच्या जोरावर लाॅकडाऊन लावून कोरोना आटोक्यात येईल, असा जर प्रशासनाचा समज असेल तर तो चुकीचा आहे.

प्रशासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, पण त्या आधी गरीबांच्या पोटापाण्याची, त्यांना दोनवेळ जेवण मिळेल याची प्रशासन काय व्यवस्था करणार आहे हे स्पष्ट करावे, त्यानंतरच कुठलाही निर्णय जाहीर करावा, असेही इम्तियाज जलील म्हणाले. कोरोना रुग्णांची संख्या केवळ औरंगाबादेतच नाही तर राज्यात व जगभरात वाढते आहे. मग लाॅकडाऊन फक्त औरंगाबादेतच का? असा सवालही त्यांनी केला.

शहरवासियांनी देखील लाॅकडाऊनची वेळ का ओढावली याचा थोडा विचार करावा. योग्य काळजी घेतली, कोरोना नियमांचे पालन केले तर शहर बंद करण्याची वेळ येणार नाही. पण आपल्या हलगर्जीपणामुळेच ही वेळ येऊ घातली आहे. आता तरी कोरोना नियमांचे पालन करा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा, वारवांर हात धुवा, असे आवाहन देखील इम्तियाज जलील यांनी केले.

Leave a Reply