लसीकरणात पुणे पालिकेचा लागणार कस..

‘कोवॅक्सीन’, ‘कोविशील्ड’चे डोस देताना केंद्रावरील नियोजन महत्त्वाचे
एकाच लसीचे दोन डोस घ्यावे लागणार; वेगवेगळ्या लसीचे डोस ठरू शकतात अडचणीचे
पुणे – ‘कोवॅक्सीन’ आणि ‘कोविशील्ड’ या दोन्ही लसी आता मोठ्या संख्येने महापालिकेला मिळणे सुरू झाल्याने याचे ‘मॅनेजमेंट’ महापालिकेला करावे लागणार आहे. मंगळवारपासून महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर ‘कोवॅक्सीन’ देण्याला सुरूवात केली जाणार आहे.
करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पुणे महापालिकेला रविवारी 50 हजार ‘कोवॅक्सीन’ लसींचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे मंगळवारपासून ती लस देण्यात येणार आहे.
कोविशील्ड’ लसीचा पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांना केवळ मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय, येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालय आणि ससून रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवरच दुसरा डोस दिला जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पुणे महापालिकेने राज्याच्या आरोग्य विभागाकडे करोना प्रतिबंधक लसींचे एक लाख डोस देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, पालिकेला रविवारी ‘भारत बायोटेक’ कंपनीच्या ‘कोवॅक्सीन’ या स्वदेशी लशीचे 50 हजार डोस देण्यात आले. आतापर्यंत शहरातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर ‘सीरम इन्स्टिट्यूट’ची ‘कोविशील्ड’ लस देण्यात येत होती. मात्र, त्या ऐवजी ‘कोवॅक्सीन’ लसीचा पुरवठा झाल्याने पालिकेने लसीकरण प्रक्रियेचे नव्याने नियोजन केले आहे.
सध्या, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी, 45 ते 59 वयोगटातील सहव्याधीग्रस्त व्यक्ती आणि 60 वर्षांपुढील ज्येष्ठांना करोना प्रतिबंधक लस टोचण्यात येत आहे. यामध्ये प्रथमच लस घेणाऱ्या नागरिकांना महापालिकेच्या रुग्णालयात आता ‘कोवॅक्सीन’ लस टोचण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी ‘कोविशील्ड’ लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना कमला नेहरू रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय आणि ससून रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर ‘कोविशील्ड’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे, असे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.
खासगी लसीकरण केंद्रांवर…
शहरातील खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांवर ‘कोविशील्ड’चा पुरेसा साठा उपलब्ध असल्यास, तीच लस देण्यात येणार आहे. तो साठा संपल्यावर खासगी रुग्णालयांमध्येही ‘कोवॅक्सीन’ लस देण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांकडून दोन्ही लशींची मागणी करण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने ही मागणी नाकारली आहे.
सर्वच लाभार्थ्यांना कोणती लस कोणत्या भागात मिळेल किंवा दोन सेशन कोठे सुरू आहेत हे समजणारे नसते, त्यामुळे अशी ‘रिस्क’ घेऊ शकत नसल्याचे डॉ. भारती म्हणाले. तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव यांनीही एका रुग्णालयात दोन सेशन करण्याची परवानगी देण्याला सध्यातरी नकार दिल्याचे डॉ. भारती यांनी नमूद केले. परंतु, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.