October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

लग्नानंतर लेकाचा मृत्यु,सास-यांनी केल सुनेच कन्यादान

बुलडाणा जिल्ह्यातल्या शालिग्राम वानखडे आणि वत्सला वानखडे या दाम्पत्यानं नुकतंच आपल्या सुनेचं कन्यादान केलंय.

शालिग्राम वानखडे (66) आणि वत्सला वानखडे (60) हे दाम्पत्य बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील सुनगावमध्ये वास्तव्यास आहे.

सध्या या दाम्पत्याची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे, कारण जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या या दांपत्याने सुनेच्या इच्छेप्रमाणे तिचं लग्न लावून दिलं आहे.

शालिग्राम आणि वत्सला यांच्या मुलाचं, संतोष वानखडे यांचं लग्न 16 मार्च 2020 रोजी राधा उमाळे यांच्याशी झालं होतं. पण लग्नानंतर पाच महिन्यांनी संतोष यांचा मृत्यू झाला.

शालिग्राम सांगतात, “आमच्या मुलाचं लग्न 16 मार्च 2020ला झालं होतं.

त्याच्यानंतर तो चार महिने राहिला. 31 ऑगस्ट 2020 ला तो विहिरीत पाणी काढायला गेला आणि पडला. त्याचा मृत्यू झाला.”

यानंतर वानखडे दाम्पत्याची सून राधा माहेरी गेली आणि 15 दिवसांनी परत आली. पसंतीचं स्थळ आल्यास तुम्हीच माझं लग्न लावून द्या, अशी मागणी राधा यांनी सासू-सासऱ्यांकडे केली.

शालिग्राम सांगतात, “आमची सून वापस आली आणि म्हणाली, जे स्थळ आहे ते बघून घ्या, मी स्वखुशीनं लग्न करायला तयार आहे. ते स्थळ बोलावून घ्या. आम्ही ते स्थळ बोलावलं. आम्ही म्हटलं तुझी स्वखुशी पाहा. तू सुखानं राहिली पाहिजे हेच आमच्यासाठी चांगलं आहे.”

त्यानंतर पुढचे सहा महिने राधा आपल्या सासरी म्हणजेच सुनगावला राहिल्या. त्यांना आलेल्या स्थळांपैकी त्यांनी खेर्डा येथील स्थळ पसंत केलं.

सुनेच्या इच्छेचा मान राखत गावकरी आणि नातेवाईकांच्या साथीनं वानखडे दाम्पत्यानं खेर्डा येथील प्रशांत राजनकार यांच्यासोबत सूनेचं लग्न लावून दिलं.

वत्सला शालिग्राम वानखडे सांगतात, “आमचे नातेवाईकही म्हणे तिचं लग्न करून द्या. सगळ्यांनी आम्हाला मदत दिली. तुम्ही मुलगी समजून तिचं लग्न लावून द्या. आम्ही तिला मुलगी समजूनच प्रेम दिलं. मग आम्ही तिचं लग्न लावून दिलं. हे सोपं नव्हतं पण सुनेनं पक्का निर्णय घेतला आणि आम्ही तिला साथ दिली.”

5 मार्च 2021 रोजी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करून हा लग्न सोहळा पार पडला.

पण, वानखडे कुटुंबीयांसाठी हा निर्णय सोपा नव्हता. कारण गावात आणि वानखडे यांच्या नात्यात अशी घटना पहिल्यांदाच घडणार होती.

याविषयी वत्सला सांगतात, “मनाची तयारी म्हणजे छातीवर दगड ठेवून करावंच लागलं सूनेचं लग्न. तिचं काही जास्त वय नव्हतं. आम्ही कितीक दिवस वागवू शकलो असतो तिला. म्हणून मग आम्ही हा पक्का निर्णय घेतला.”

शालिग्राम आणि वत्सला वानखडे यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांना दरमहा मिळणाऱ्या पेंशनवर चालतो. दरमहा दोघांना प्रत्येकी 1 हजार रुपये पेंशन मिळतं.

कुटुंबानं महिलेच्या पाठीशी राहावं – राधा राजनकार

राधा यांना भेटण्यासाठी आम्ही खेर्ड्याला पोहोचलो तेव्हा त्या घर झाडत होत्या.

लग्नाच्या निर्णयाविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितलं, “मला खेर्ड्याचं सगळं घर-दार पसंत आलं होतं. मला जास्तीत जास्त पोरगा पसंत आला होता. कारण की तो अपंग आहे म्हणून. अपंगच अपंगाला समजून घेते. मीसुद्धा अपंग आहे.”

राधा आणि प्रशांत हे दोघेही एका हातानं अधू आहेत.

आम्ही खेर्ड्यातून निघताना राधा यांनी सांगितलं, “मी जसा माझा निर्णय घेतला आणि सासू सासरे माझ्या पाठीशी राहिले. तसाच एखाद्या महिलेनं किंवा सुनेनं निर्णय घेतला तर घरच्यांनी तिच्या पाठीशी राहिलं पाहिजे,” अशी अपेक्षा राधा व्यक्त करतात.

Leave a Reply