October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

रेल्वेचे खाजगीकरण? वाचा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे संसदेतील उत्तर

नवी दिल्ली – केंद्र सरकार सध्या अनेक सरकारी कंपन्यांमध्ये खासगी गुंतवणुकीला प्राधान्य देत आहे. यावरून सातत्यानं विरोधी पक्ष टीका करत आहे. यात सरकार आता रेल्वेचंही खासगीकरण करेल असा आरोप विरोधकांनी केला. यावर मंगळवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत रेल्वेच्या खासगीकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. रेल्वेचं खासगीकरण होणार की नाही यावर खुलासा करताना त्यांनी म्हटलं की, रस्तेसुद्धा सरकारने बनवले आहेत त्यावर खासगी गाड्या धावतातच ना? तेव्हा कोणी म्हणतं का की यावरून फक्त सरकारी गाड्याच गेल्या पाहिजेत. सोमवारी चर्चेवेळी काँग्रेसच्या जसबीर सिंह गिल, आययूएमएलच्या ई टी मोहम्मद बशीर यांच्यासह इतर काही सदस्यांनी रेल्वेच्या खासगीकरणाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता.

पीयूष गोयल म्हणाले की, रेल्वेचं कधीही खासगीकरण करण्यात येणार नाही. रेल्वे नेहमीच भारत सरकारच्या अखत्यारित राहिल. मी विश्वास देतो की रेल्वे ही भारताची संपत्ती असून रेल्वेचं खासगीकरण होणार नाही. रेल्वेच्या प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, रेल्वेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी, यासाठी खासगी क्षेत्राची गुंतवणूक देशहितासाठी होईल.

लोकसभेत 2021-22 च्या रेल्वे मंत्रालया अंतर्गत असलेल्या अनुदानाच्या मागणीच्या चर्चेला उत्तर देताना पीयूष गोयल यांनी सांगितलं की, दुर्दैवी गोष्ट अशी आहे की खासदारांकडून खासगीकरण आणि कार्पोरेटायझेशनचा आरोप केला जात आहे. पण रेल्वेचं असं काही होणार नाही. सरकार रस्तेबांधणीसुद्धा करते आणि त्यावर फक्त सरकारी गाड्यांनाच परवानगी द्यावी असं कोणी म्हणत नाही. रस्त्यावर सर्व प्रकारची वाहने चालतात म्हणूनच प्रगती होते आणि सर्वांना सुविधा मिळतात. रस्त्यांचं उदाहरण देत गोयल म्हणाले की, रेल्वेच्या बाबतीत असं होऊ नये का? प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळू नयेत का? मालवाहू रेल्वे चालाव्यात आणि यासाठी जर खासगी क्षेत्र सहभागी होत असेल तर यावर विचार का करू नये असे प्रश्नही त्यांनी विचारले.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, गेल्या सात वर्षात रेल्वेमध्ये लिफ्ट, एस्केलेटर यांसह इतर सुविधांसाठी मोठं काम झालं आहे. जर आपल्याला रेल्वे अत्याधुनिक करायची असेल तर पैशांची गरज पडेल. अमृतसरसाठी 230 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह योजना तयार केली आहे. अशा 50 स्टेशन्सच्या मॉडेलचं ड़िझाईन तयार करण्यात आलं आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या सुशोभिकरण आणि आधुनिकीकरणासाठी व्यापक गुंतवणूक केली जात ओआहे. जर खासगी गुंतवणूक यात येईल तर देशाच्या आणि प्रवाशांच्या फायद्याचं आहे. खासगी क्षेत्रात ज्या सेवा दिल्या जातील त्या भारतीय नागरिकांना मिळतील. रोजगार उपलब्ध होतील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल.

Leave a Reply