रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, सोन्याचे दागीने दिले परत, बार्शी पोलिसांकडून सन्मान

बार्शी ;
येथील जावळी प्लॉट परिसरातील महिलेने रिक्षातून प्रवास केल्यानतर घाईगडबडीने विसरुन राहिलेल्या पर्समध्ये सोन्याचे दागीने गहाळ झाले. याप्रकरणी सदरच्या महिनेले बार्शी पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसांनी तपास सुरु करण्यापूर्वीच प्रामाणिक रिक्षाचालकाने सदरच्या महिलेचा शोध घेवून त्यांचे गहाळ झालेले दागीने त्यांच्या सुपूर्द केले. याबाबत पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी प्रामाणिक रिक्षाचालक राजाभाउ मुंढे यांना अभिनंदन पत्र देवून सन्मान आणि चांगल्या कामाचे कौतुक केले आहे. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मुळे, अनंत देशमाने, अजय घोडके, संतोष घाडगे, इश्वर साखरे आदी उपस्थित होते.
गुरूवारी दुपारी अडीचच्या दरम्यान त्यांनी रिक्षा क्रमांक एम.एच.१३- ४६४४ या वाहनातून विजया आशिष मोरे यांनी जावळी प्लॉट पासून विठ्ठल नगर येथील घरापर्यंतचा प्रवास केला. काही वेळानंतर त्यांना रिक्षातच आपली पर्स राहीली असल्याची आठवण झाली. आपली मौल्यवान वस्तू सोबत नसल्याचे उशीराने लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांची मदत घेतली. याबाबत रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मुळे यांना सदरची माहिती मिळताच त्यांनी संघटनेच्या सोशल मिडीयावर घडलेल्या घटनेबाबत कळवून पोलिसांना तपासकामात मदत करण्याचे आवाहन केले. तर इकडे सोशल मिडीया वापरण्यायोग्य मोबाईल नसलेल्या मुंडे यांना आपल्या रिक्षात महिलेची पर्स राहिलेली पाहून त्यांनी तात्काळ ती आपल्या ताब्यात घेवून सुरक्षित ठेवली. बाहेरगावी हुरडा पार्टीसाठी घेतलेल्या प्रवास भाड्याचा व्यवहार आटोपून त्यांनी त्या महिलेच्या घराजवळ शोध घेवून पर्स विसरल्याची व आपली वस्तू सुरक्षित असल्याची आनंदाची वार्ता सांगीतली, त्यानंतर पोलिसांसमक्ष सदरच्या ऐवजाचा ताबा त्यांनी दिला.
याबाबत पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी प्रामाणिक रिक्षाचालकाचे अभिनंदन केले. आजकालच्या सोन्याच्या वाढत्या किमती आणि त्यातूनही दिसणारा प्रामाणिकपणा हा कौतुक करण्यायाेग्य आहे. समाजात वाईट लाेकांची भरती अाहे परंतु चांगली माणसे देखिल असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.