राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांना मिळेल ‘हे’ खाते

मुंबई । भाजपसाठी 40 वर्षे योगदान दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून येत्या शुक्रवारी दुपारी 2 वाजता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची मोठी आणि अधिकृत घोषणा जयंत पाटील यांनी केली आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र, खडसे यांच्या स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे या मात्र भाजपमध्येच राहणार असून हा खडसे यांच्या राजकीय खेळीचा भाग असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवर खडसेंची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे.
त्यानंतर खडसे यांना गृहनिर्माण, जलसंपदा किंवा कृषी अशा मोठ्या खात्याची जबाबदारी मिळण्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे.
गृहनिर्माण खातं सध्या जितेंद्र आव्हाड तर जलसंपदा खातं जयंत पाटील यांच्याकडे आहे. आव्हाड आणि पाटील हे दोघेही राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. अशावेळी त्यांच्याकडून मोठ्या खात्याची जबाबदारी काढून ती भाजपमधून येणाऱ्या खडसेंना दिली जाणार का? असा प्रश्नही दबक्या आवाजात विचारला जात आहे.