February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

राज्यातील ब्युटी पार्लर व सलुन व्यावसायिकांचा बंदला विरोध

मुंबई;

राज्यात सलून व ब्युटी पार्लर 30 एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेत रविवारी घेतला आहे. मात्र शासनाच्या या निर्णयाला राज्यातील सलून व ब्युटी पार्लर संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. इतर दुकाने आठवड्यातील पाच दिवस सुरू असताना फक्त सलून आणि ब्युटी पार्लरच बंद का ठेवायचे? असा उलट सवाल सलून व ब्युटी पार्लर संघटनांमधुन उपस्थित केला जात आहे.

Advertisement

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय अनारसे यांनी  सांगितले की, गत वर्षी पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे शहरी व ग्रामीण भागात तब्बल 17 बांधवांनी आत्महत्या केल्या होत्या.

 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना किंवा राज्यातील कुठल्याच नाभिक बांधवाला शासनाने अद्याप मदत केलेलीच नाही. जुनी देणी भागवण्याचे काम सुरू असतानाच शासनाने पूर्ण व्यवसाय बंद कऱण्यास सांगितल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढणार आहे. यापुर्वीच दागिने विकून पुन्हा व्यवसाय सुरू करण्यात आला होता. मात्र आत्ता तर तेही शक्य होणार नाही. त्यामुळे शासनाने त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करणे गरजेचे आहे.

मुंबई सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशचे अध्यक्ष दीपक यादव यांनी शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. यादव यांनी सांगितले की, मिशन बिगीन अगेनमध्ये आखून दिलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करत सलूनचालक उदरनिर्वाह चालवत होते. गर्दी होईल अशा दुकानांना परवानगी देत शासनाने गर्दी टाळणार्‍या सलून व ब्युटी पार्लरवर बंदीची कुर्‍हाड चालवली आहे. सलून व्यवसायिक व कारागीर यांना हा लॉकडाऊन आर्थिकदृष्ट्या सहन होणारा नाही. दुकान सुरू करण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते अजून थकलेले आहेत. त्यात गेल्या चार महिन्यांत थकलेले दुकानाचे भाडे व लाईट बिल भरण्याचा प्रयत्न कारागीर करत असताना मात्र आता शासनाने पुन्हा सलूनचालकांना आर्थिक संकटात टाकलेले आहे.

लवकरच बैठक घेऊन निर्णय जाहीर करणार

सरकारने घेतलेला निर्णय मान्य करताच येणारच नाही. मुळात याआधी घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून सलून व ब्युटी पार्लर चालक व्यवसा करत आहेत. त्यात डिस्पोजल अप्रॉन, सॅनिटायझेशन, मास्क यांचा वापरही सुरू आहे. व्यवसाय खर्चिक झाला असला, तरी पोटाला चिमटा काढून रोजगार टिकवण्याचे काम सुरू होते. तरीही इतर दुकानांप्रमाणे शनिवार व रविवारी पूर्णपणे सलून व ब्युटी पार्लर बंद ठेवण्याचा निर्णय व्यवसायिकांनी मान्य केला होता. मात्र सरसकट 30 एप्रिलपर्यंत सलून बंद ठेवणे यावेळेस अशक्य आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात लवकरच राज्यातील सलून व ब्युटी पार्लर चालक व कारागीर यांची बैठक होणार आहे. तसेच सर्वानुमते निर्णय घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार आहे.
– उदय टक्के, सल्लागार – सलून व ब्युटी पार्लर असोसिएशन-महाराष्ट्र

Leave a Reply