राज्यातील पोलिसांच्या कुटूंबासाठी मोफत रक्तपुरवठा, बार्शीतील भगवंत रक्तपेढीचा उपक्रम

बार्शी;-महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शीतील भगवंत रक्तपेढीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. रक्ताची अपघातानंतरची गरज, शस्त्रक्रिया यासारख्या अत्यावश्यक समयी हाक दिल्यानंतर पहिल्या हाकेलाच मदतीला धावून येणारी मानवतावादी रक्तपेढी म्हणून रक्तपेढीचा उल्लेख करावा लागेल. वेळोवेळी गरजवंताची पूर्तता केल्याने विश्वास संपादन करून नावलौकिक प्राप्त केलेल्या भगवंत रक्तपेढीचा आदर्श राज्यातील इतरही रक्तपेढ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी व्यक्त केले.
अतिरेक्यांच्या २६/११ च्या मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यासाठी बार्शी पोलिसांचे रक्तदान शिबीर घेण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. बुधवारी दि.२ रोजी शहर पोलिस ठाण्यात हे शिबीर पार पडले, या शिबीरात १०३ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
यावेळी पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, रक्तपेढीचे अध्यक्ष शशिकांत जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक अमोल ननवरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे, बाळासाहेब नाईकनवरे, रुपेश शेलार, हवालदार गुळमे यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते.
शशिकांत जगदाळे म्हणाले अहोरात्रपणे कायदा- सुव्यवस्थेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून देशसेवा करणाऱ्या पोलिसांबद्दल आदर आणि कृतज्ञता म्हणून रक्तपेढीने चार वर्षांपासून केवळ बार्शी तालुक्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मोफत रक्तपुरवठा सुरू केला. आता बार्शी शहरापुरते मर्यादित न ठेवता राज्यातील प्रत्येक पोलिस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांसाठी रक्तपुरवठा केला जाणार आहे. मोफत रक्तपुरवठा करतांना सेवेतील पोलिस कर्मचारी, कर्करुग्ण, कोरोना पार्श्वभूमीवर मुंबई महापालिला यांचा समावेश होता. यासह कर्मवीर योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या किमतीत रक्तपुरवठा केला आहे. मोफत नेत्र चिकित्सा शिबीरातून चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, श्रवण यंत्राचे वाटप यासारखे विधायक उपक्रम देखिल राबवून कर्तव्य निभावले आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून कोविड योध्दा म्हणून काम केलेल्या पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी समाजाचे देणे लागतो या उद्देशाने काम करतांना आनंद होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
संतोष गिरीगोसावी म्हणाले, अत्यावश्यक सेवेतील वैद्यकिय सेवेत रक्तपेढीची नितांत आवश्यकता असते. अशा ठिकाणी जगदाळे यांच्यासारख्या कार्यतत्पर व्यक्तीमुळे अनेकांचे जीव वाचविणे शक्य होते. राज्यातील पोलिसांसाठी भगवंत रक्तपेढीने राबविलेल्या उपक्रमामुळे चांगली मदत होणार आहे.