October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

महाराष्ट्र शासनाचा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार ज्ञानेश्वर जाधवर यांच्या यसन कादंबरीस घरपोच प्रदान

बार्शी ;
     महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार योजनेअंतर्गत सन 2019 राज्य पुरस्कार शासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत.  सद्य:स्थितीत कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्याकारणास्तव सन 2019 च्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय  पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन न करता सदर पुरस्कार संबंधित सर्व साहित्यिकांना घरपोच प्रदान करण्याचे शासनाचे  आदेश आहेत.  या अनुषंगाने शासनाकडून  ज्ञानेश्वर जाधवर यांच्या “यसन” या कादंबरीस जाहीर झालेल्या श्री. ना. पेंडसे पुरस्काराचे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे प्रतिनिधी संतोष देशट्टीवार  यांच्या मार्फत  ज्ञानेश्वर  जाधवर यांना  घरपोच प्रदान करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे प्रतिनिधी  संतोष देशट्टीवार यांच्या हस्ते राज्य वाड:मय पुरस्कार   लेखक ज्ञानेश्वर जाधवर, आजी गिरजाबाई जाधवर, वडिल प्रकाश जाधवर व आई ताराबाई जाधवर यांनी स्वीकारला. यावेळी नरसिंग अंबुरे, किरण कांदे ,  एस. एम काटकर , सुनिल जाधवर, पोलिस पाटील भरतरी कांदे आदी उपस्थित होते.

Advertisement

यसन कादंबरी वास्तव व मानवतावादी आहे.  यसन ही मराठी साहित्यातील पहिली कादंबरी आहे की जी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या जगण्या व शिक्षणासंदर्भात भाष्य करणारी वास्तववादी साहित्यकृती आहे. पाड्या पाड्यावर, तांड्या तांड्यावर लहान मुलं मजुरीचं काम करतात आणि आयुष्याची गुजरन करतात. पण काही मुलं काम करून शिक्षणाचा रस्ता शोधतात. त्यांच्या आयुष्यात नेमकं काय होतं? मुकादम, फड मालक, कारखान्याची माणसं यांच्या जाचा पासून सुटनं खूप कठीण म्हणून आई-वडिल मुलाला शिकवण्याचा ध्यास घेतात. जो त्रास आपण भोगलाय तो आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नाही म्हणून आहोरात्र झटतात. त्याच भीषण वास्तव नेमकं काय आहे.? “दुस-यांच्या फ़डातील ऊस तोडता तोडता आन त्याच पाचाट काढता काढता आमच्या आयुष्याच पाचाट कवा झालं ते कळलं नाय” असं  नायकाचा बाप म्हणतो. हे म्हणण्यापाठीमागे मानशास्त्र काय आहे?
यसन” ही कादंबरी व्यवस्थेतील अप्रत्यक्ष असणा-या यसनींवर भाष्य करते. खरं तर प्रत्यक्ष दिसणारी यसन ही बैलांच्या नाकात असते पण माणसांच्या आयुष्यत दृश्य-अदृश्य असंख्य प्रकारच्या यसनी बांधलेल्या आहेत. ह्या यसनी १९९० च्या आसपास जन्मलेल्या पिढीला जास्त जाचक ठरूल्या. त्यामुळे त्यांचं जिवन अडचणीच्यां कचाट्यात सापडलं आहे. या यसनी सोडवण्याचा प्रयत्न कादंबरीतील नायक वामन सोनवणे करू पाहत आहे, जो ऊसतोड काम करणा-या कुटूंबात जन्मला आहे. जन्मल्यापासून जे आयुष्य तो जगतोय त्यांन त्याचं आतडं पिळवटून निघालं. 

Leave a Reply