भाजपा खासदार शर्मा यांची आत्महत्या

नवी दिल्ली- भाजप खासदार रामस्वरुप शर्मा (वय 62) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती कळत आहे. रामस्वरुप शर्मा हे हिमाचल प्रदेशमधून दोनवेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यांचा मृतदेह खासदारांचे निवासस्थान ‘गोमती’ याठिकाणी आढळून आला आहे. दिल्लीच्या राममनोहर लोहिया हॉस्पिटलजवळ त्यांचे निवासस्थान आहे. पोलिस प्रकरणाची चौकशी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी आत्महत्या केली असून यामागचं कारण समजू शकलेलं नाही. माहितीनुसार, त्यांनी आपल्या खोलीमध्ये फाशी लावून घेतली आहे. यावेळी दरवाजा आतून बंद करण्यात आला होता. त्यांच्या स्टाफने फोन केल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले.
रामस्वरुप यांच्या मृत्यूमुळे आज होणारी भाजप खासदारांची बैठक रद्द करण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून रामस्वरुप शर्मा खासदार होते. ते 62 वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांची प्रकृती सुधारत होती, पण आता त्यांनी आत्महत्या केल्याचं कळतंय. सांगितलं जातंय की, रामस्वरुप शर्मा आजारामुळे डिप्रेशनमध्ये होते. रामस्वरुप शर्मा स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुदामा म्हणायचे. शर्मा यांनी 1985 मध्ये एनएचपीसीमध्ये नोकरी केली होती. तसेच ते कबड्डी प्लेअरही होते. शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात. 2014 मध्ये भाजपने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले होते. दरम्यान ,काही दिवसांपूर्वी दीव आणि दमनचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती.