February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

“ब्रेक द चेन” या लाॅकडाऊन शासन आदेशाचा फेरविचार करावा- अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी

पंढरपूर

“ब्रेक द चेन”या शासन आदेशाचा फेरविचार करावा अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती जिल्हा संघटक शशिकांत हरिदास यांनी दिली.
महाराष्ट्रातील वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी
ब्रेक द चेन नावाने
जो आदेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे तो या राज्यातील छोटे-मोठे व्यापारी,ग्राहक वर्गावर अन्याय करणारा आहे.
फक्त शनिवार रविवार असे दोन दिवस बंद म्हणुन सांगून प्रत्यक्षात सुमारे एक महीना बंद ठेवायचा आदेश काढला आहे.हा आदेश ग्राहकांच्याही अडचणीचा आहे. अशा निर्णयाने अर्थचक्र चालू राहणार नाही,ही वस्तुस्थिती आहे.
या आदेशाप्रमाणे ९० टक्के व्यापार हा बंद राहणार आहे. निर्बंध कडक करणे म्हणजे व्यापारी अस्थापना, दुकाने बंद करणे हे समजणे चुकीचे होईल.अशा लाॅकडाऊनला अ.भा. ग्राहक पंचायतीचा विरोध आहे.
उदा.लग्न समारंभासाठी ५० व्यक्तीना परवानगी द्यायची आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कापड ,भांडी, रेडीमेड, फर्निचर, चप्पल इ.वस्तुंची दुकाने महिनाभर बंद ठेवायची. यात ना जनतेचा विचार ,ना व्यापाऱ्यांचा विचार केल्याचे दिसून येते.
मर्यादित समारंभासाठी आवश्यक असलेल्या किमान वस्तु तरी मिळाल्या पाहिजेत. मात्र अशा वस्तूंची दुकाने, अस्थापना बंद ठेवायच्या.त्यामुळे ही मंगलकार्य रद्द करण्याची वेळ यावी अशीच परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे.
यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याचा विचार करणे आवश्यक होते,आहे.

१) पाच दिवसांत स्थानिक पातळीवर विभागणी करुन दुकाने ,अस्थापना सुरू ठेवावीत.
२) वेळेतसुध्दा कपात करण्याचा विचार करण्यास हरकत नसावी.
*३) *कठोर निर्बंधांची* (वैद्यकीय तपासणी, सुरक्षित अंतर, मास्क वापर, सॅनिटायजरचा वापर इ) कडक अंमलबजावणी करण्यात यावी त्यामध्ये सवलत देऊ नये.

४) शनिवार, रविवार आठवड्यातील दोन दिवस संपूर्ण (किराणा भाजीपालासह) व्यापार बंद ठेवण्यात यावा
फक्त वैद्यकीय सेवा, औषध दुकाने, त्याअनुषंगिक सेवा व दुध पुरवठा हेच सुरू ठेवावे. बाकी सर्व बंद ठेवण्यात यावे.
आजच्या परिस्थितीत २५ दिवस दुकाने, अस्थापना बंद ठेवणे हे व्यापारी वर्गाला परवडणारे नाही.त्याचबरोबर ग्राहकांनाही अडचणीचे ठरणार आहे. रोज काम करून संसार चालविणाऱ्या कुटुंबांना अत्यावश्यक वस्तू शिवाय इतर वस्तुंची एकदम खरेदी करून ठेवणे शक्य नाही.
कारण मागील संपूर्ण वर्ष या कोविडमुळे प्रचंड अडचणींना तोंड देत सर्वजण कसे तरी आपला संसार चालविणेचा प्रयत्न करीत आहे
आता पुन्हा सुमारे एक महीना दुकाने बंद ठेवली तर जगणेही अवघड होणार आहे. कारण कामगारांचे पगार, बॅंकेचे व्याज व हफ्ते, लाईट बील, जागा भाडे इत्यादी खर्च सुरुच राहणार आहेत. त्यामुळे कोणालाही दुकाने बंद ठेवणे परवडणारे नाही. व्यापाऱ्यांना व्यवसाय सुरू ठेऊनच त्यांचे व कामगारांचे संसार व्यवस्थीत चालु ठेवू शकतील.
जर सरकार आपलं उत्पन्न सुरू ठेवण्यासाठी वाईन शॉप, फिल्म शुटिंग, बस, इतर वाहतूक सेवा असे उत्पन्नाचे मार्ग सुरू ठेवत असेल तर व्यापाऱ्यांची उपजिविका चालविणे करिता त्यांचा व्यवसाय सुरू ठेवणे व दररोज कमावणाऱ्या ग्राहकांनाही सर्व वस्तू मिळणे आवश्यक आहे.
तरी या सर्व गोष्टींचा विचार करून ब्रेक द चेन चे सुधारित आदेश काढावेत अशी मागणी भालचंद्र पाठक, प्रांत सचिव,
सुभाष सरदेशमुख, प्रांत कार्य.सदस्य
दीपक इरकल प्रांत विषय समिती प्रमुख,
विनोद भरते, जिल्हाध्यक्ष
सुहास निकते,जिल्हा कोषाध्यक्ष
यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सर्वजण या कोविड विरुद्धच्या लढ्यात सहभागी होऊन मात करु या!.

Leave a Reply