October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बिनविरोध गावात श्री भगवंत रक्तपेढी देणार मोफत रक्त. आमदार राजेंद्र राऊत यांनी मांडली संकल्पना

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी तालुक्यात ज्या गावांमध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थांच्या एकमताने बिनविरोध निवडून येतील त्या गावांमध्ये सर्व ग्रामस्थांना आवश्यकतेनुसार मोफत रक्तपुरवठा करण्यात येईल असा निर्णय श्री भगवंत ब्लड बँकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे यांनी घेतला आहे. असा निर्णय घेणारी भगवंत रक्तपेढी ही राज्यातील पहिली रक्तपेढी आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनी रक्तदानाच्या चळवळीला गती देणाऱ्या भगवंत ब्लड बँकेच्या माध्यमातून ही अभिनव संकल्पना मांडली आहे. बार्शी तालुक्यात 94 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. गेले आठ महिने जागतिक महामारी असलेल्या कोरोना रोगांनी थैमान घातले होते. त्यानंतर कोरोणाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने टाळेबंदी घोषित केली होती. त्यानंतर अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला रोजगार निर्मिती ठप्प झाली. सर्व क्षेत्रावर आर्थिक मंदीची लाट आली. अशा परिस्थितीमध्ये होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडी झाल्या तर, निवडणुकीमध्ये होणारा अवास्तव  खर्च वाचेल .गावागावांमध्ये असलेले सूड बुद्धीचे, ताण-तणावाचे आरोप  प्रत्यारोपांचे राजकारणाला पायबंद बसेल. बिनविरोध निवडीमुळे गावागावांमध्ये एकोप्याचे वातावरण निर्माण होईल. गावांमध्ये निवडणुकीदरम्यान होणारे संघर्षाचे प्रसंग टळतील. गावागावांमध्ये शांतता राहील तसेच बिनविरोध निवडीमुळे सर्व ग्रामपंचायत सदस्य विकासासाठी एकजुटीने काम करतील. त्यामुळे उदांत दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आमदार राजेंद्र राऊत यांनी ग्रामीण रुग्ण रक्तकल्याणकारी योजना मांडली असल्याचे जगदाळे यांनी यावेळी सांगितले. मोफत रक्त देण्यामागे बिनविरोध निवडणूकीला चालना देणे, सर्व गावकऱ्यांमध्ये निरोगी, निकोप वातावरण निर्माण करणे. शस्त्रक्रिया व विविध आजारांमध्ये उपचारादरम्यान अत्यावश्यक असलेले रक्त मोफत देऊन ग्रामीण भागाविषयी असलेली सामाजिक बांधिलकीची भावना जोपासणे हा व्यापक हेतू असल्याचेही जगदाळे यांनी यावेळी सांगितले .भगवंत ब्लड बँकेच्या विधायक व कल्याणकारी योजनांमध्ये श्री शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे व शिक्षण संस्था चालक रावसाहेब मनगिरे यांचेही भरीव मार्गदर्शन लाभत असल्याचे जगदाळे यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

Leave a Reply