March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी जि.सोलापुर येथे वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

संसदेत कामगार कायद्यामध्ये सुधारणा विधेयक नुकतेच मंजूर झाले आहे. कष्टकरीे, त्यांच्या संघटनेने आजपर्यंत लढून थोडेबहुत जे अधिकार मिळवले आहेत, ते अधिकार हिरावून घेणारे हे विधेयक आहे. याद्वारे केंद्र सरकारने कामगार वर्गावर प्रचंड मोठा आघात केला आहे. हे विधेयक कष्टकरी, कामगार वर्गाचे जीवन उध्वस्त करणारे आहे असे मत प्रा तानाजी ठोंबरे यांनी व्यक्त केले.

माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन तसेच वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला जातो. बार्शीत वृत्तपत्र विक्रेते, एजंट यांनी हा दिन उत्साहात साजरा केला. उपळाई रस्त्यावरील शंभूराजे हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष असिफ तांबोळी होते.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व मान्यवरांचे पुस्तक देवून सत्कार करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

प्रा ठोंबरे म्हणाले,  मालक विरूद्ध कामगार असा हा वर्गीय लढा असून आपण कामगार वर्गाचे अाहोत. जगाचा, समाजाचा आजपर्यंतचा इतिहास हा या दोन वर्गाच्या संघर्षाचा इतिहास आहे. एका बाजूला आहे ‘आहे रे’ वर्ग आणि दुसऱ्या बाजूला ‘नाही रे’ वर्ग आहे. कामगार या शब्दाचा खूप परीघ खुप मोठा आहे. त्यात कष्टकरी, कामगार याबरोबरच माध्यमातील कर्मचारी, बातमीदार, वितरक, अगदी प्राध्यापक वर्ग सुद्धा येतो. सर्वांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत. आज कोणी जात्यात आहे तर कुणी सुपात आहे तर कोणी मुठीत आहे. सरकार भांडवलदारांचे हित जोपासत आहे. त्यामुळे कामगार वर्गाची गळचेपी होत आहे. या विरोधात एकट्या-दुकट्याने लढण्याचे दिवस नाहीत. त्यामुळे सर्व कामगार संघटनांनी हातात हात घालून काम केले पाहिजे असे व्यक्त केले.

प्रा ठोंबरे पुढे म्हणाले, जगाच्या बातम्या असलेले वर्तमानपत्र तुम्ही (विक्रेते) लोकांपर्यंत पोहोचवतात. यात तुमच्या जीवनाशी निगडित काही आहे का ? याचा कधी आपण विचार केलाय का ? तुम्ही वृत्तपत्र वाटून इतके थकता की वृत्तपत्र वाचतच नाही. यात काही बदल होणार आहे का नाही ? का हे असेच चालणार आहे ? याचा विचार केला पाहिजे कारण तुम्ही कामगार आहात.  माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम वृत्तपत्र वितरणाचे काम करत होते तसेच शाहिर अमर शेख यांनी देखील वृत्तपत्र वितरणाचे काम केले. आपले घराणे खूप मोठे आहे. ते समजून घ्या. सजग सभासद व्हा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, बार्शी वकील संघाचे अध्यक्ष काकासाहेब गुंड, पत्रकार सचिन वायकुळे यांनी समयोचीत विचार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर पत्रकार संतोष सुर्यवंशी, शहाजी फुरडे, वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे उपाध्यक्ष ताहेर काझी, गणेश वस्त्रदालनचे संतोष जाधवर आदी उपस्थित होते. यावेळी वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष सचिन बाबर, कोषाध्यक्ष शाम थोरात, उपाध्यक्ष ताहेर काझी, सचिव राजेंद्र आगवणे, सादिक शेख, सोमनाथ गाढवे, अनिल जाधव, नागेश चाटी, शरद काकडे, शाहीद शेख, सचिन शेटे, सुनील बिडवे, सुरज कोथमिरे यांच्यासह एजंट व विक्रेते उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सोमेश्वर देशमाने यांनी केले.

Leave a Reply