बार्शी ग्रामीण रूग्णालयात कोव्हीड 19 लसीकरणाचा शुभारंभ

बार्शी;
बार्शी ग्रामीण रूग्णालयात शनिवारी (ता.16) सकाळी अकरा वाजता बार्शी तालुक्यातील पहिली कोव्हीड-19 ची लस टोचण्यात आली. पहिल्या लसीचे मानकरी ठरले आरोग्य कर्मचारी गणेश शिंदे. देशव्यापी कोव्हीड-19 ची लसीकरणाची सुरवात नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे झाल्यानंतर बार्शीतील पहिली लस टोचण्यात आली.
बार्शीत कोव्हीड लसीबाबतची उत्सुकता सर्वानाच होती अखेर लस टोचण्याच्या कार्यक्रमास सुरवात झाली असून बार्शी तालुक्यात पहिल्या टप्प्यात सुमारे 3 हजार 700 लसीचे उद्दीष्ट आहे. तर शनिवारी दिवसभरात 101 लस देण्याचे उद्दीष्ट असून को विन अॅपव्दारे रिजिष्ट्रेशन झालेल्यांना ही लस प्राधान्याने देण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी दिली.
बार्शी ग्रामीण रूग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्तपणे या लसीकरण मोहिमेला बार्शीत सुरवात करण्यात आली. यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी शेखर सावंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक ढगे, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, बार्शी ग्रामीण रूग्णालयातचे वैद्यकिय अधिक्षक बनसोडे, डॉ.निशीकांत जाधव, डॉ.विलास सरवदे, जीवन ज्योत संघटनेचे अध्यक्ष अजित कुंकूलोळ, डॉ.संजय अंधारे, शिवाजी महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख प्रा. डॉ. समाधान पवार, एनएसएस विभाग प्रमुख प्रा.डॉ.रवींद्र चाटी डॉ.लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यातील कोव्हीड 19 लसीकरण कार्यक्रमानिमत्त बार्शी ग्रामीण रूग्णालयात शनिवारी सकाळ पासून आरोग्य कर्मचारी, नर्सिंग स्टाफ व डॉक्टर्सची लगबग दिसून आली. बार्शी ग्रामीण रूग्णालयाच्या प्रवेशव्दाराच्या परिसरात महिला आरोग्य कर्मचार्यांनी सुंदर रांगोळी रेखाटून देशव्यापी लसीकरणासाठी शुभेच्छा दिल्या होत्या रांगोळीत एक महिला कोव्हीड 19 ची लस टोचताना दाखवली होती तसेच मास्क,सॅनिटायझरचा वापर तसेच सुरक्षित अंतराबाबत जनजागृती करण्यात आली होती. प्रारंभी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक ढगे यानी बार्शी तालुक्यातील लसीकरणाबाबतची माहिती दिली व उपस्थितांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले. लसीकरणाची सुरवात आरोग्य कर्मचारी गणेश शिंदे यांना लस टोचून करण्यात आली. त्यानंतर अभिजीत अंधारेसह महिला डॉ. प्रांजली घुगरे यांना लस टोचविण्यात आल्याची माहिती डॉ.ढगे यांनी दिली. लसीकरणानंतर सुमारे तीस मिनटे लस टोचविण्यात आलेल्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले सर्वांची प्रकृती उत्तम होती असेही ढगे यांनी सांगितले
चौकट ः बार्शी तालुक्यात कोव्हीड 19 लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या दिवशी शनिवारी (ता.16) दिवसभरात बार्शी ग्रामीण रूग्णालयात कोव्हीड 19 लसीकरणाच्या पोर्टलवर अधिकृत नोंद झालेल्या पहिल्या 101 पैकी 71 आरोग्य कर्मचार्यांना कोव्हीशिल्ड 19 ही लस टोचण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक ढगे यांनी दिली. यावेळी आयुषचे जिल्हा अधिकारी डॉ.विलास सरवदे, डॉ.पवन गुंड, डॉ.प्रवीण मोरे, डॉ.निलीमा कुलकर्णी, योगीता पंडीत, विजय निलाखे, डॉ.कोरसाळे आदी उपस्थित होते.