बार्शीत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मानवी हक्क दिन साजरा

बार्शी;-महाराष्ट्र स्पीड न्युज
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी येथे दिनांक १० डिसेंबर २०२० रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस गोरे हे उपस्थित होते.
बी एड द्वितीय वर्ष सत्र तिसरे अंतर्गत सराव अध्यापन व छात्रसेवाकाल शिबीर सध्या ऑनलाईन पध्दतीने सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये बंद आहेत मात्र ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया अविरतपणे सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून बी एड प्रशिक्षणार्थींचे सराव पाठ अध्यापन प्रात्यक्षिक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. यातील एका प्रात्यक्षिकास अनुसरून विशेष दिनाचे आयोजन म्हणून आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोमनाथ पाटील यांनी परिपाठ सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ एम व्ही मते यांनी केले. वर्षा परकाळे यांनी मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन द्वारे मानवी हक्क यांवर सविस्तर माहिती सादर केली. यामध्ये त्यांनी मानवी हक्क संदर्भात पार्श्वभूमी, संकल्पना, हेतू, मूलभूत हक्क, स्वरूप आदी घटकांवर सादरीकरण केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ एस एस गोरे यांनी या ऑनलाईन कार्यक्रमाचे कौतुक केले. तसेच मानवी हक्क दिन यांवर सविस्तर माहिती विशद केली. समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधीत राहिले पाहिजे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगता यावे या उद्देशाने हा दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. मानवी हक्क हे सर्व मनुष्याला प्राप्त झालेले मूलभूत अधिकार आहेत. यामध्ये कोणत्याही परिस्थितीत भेदभाव केला जात नाही. मानवी हक्क हे जागतिक स्वरूपाचे असून ते सर्वाना समान आहेत. जीवनाधिकार, यातनापासून मुक्ती, भाषण स्वातंत्र्य, वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य आदी घटकांबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात सर्वांनी मानवी हक्कांची जोपासना करावी असे त्यांनी आवाहन केले.
सोमनाथ पाटील यांनी ऑनलाईन उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले. अश्विनी पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रमास प्राचार्य डॉ एस एस गोरे, समन्वयक डॉ एम व्ही मते , डॉ एस डी भिलेगावकर, डॉ व्ही पी शिखरे, डॉ एम एस डिसले , डॉ आर ए फुरडे , डॉ पी ए पाटील तसेच बी एड प्रशिक्षणार्थीं उपस्थित होते.