बार्शीतील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय नवीन इमारतीचा विषय मार्गी लावावा :राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलची मागणी

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शीतील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचा विषय मार्गी लावावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल च्या वतीने सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कडे एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी लिगल सेलचे बार्शी तालुका अध्यक्ष अॅड.हर्षवर्धन बोधले,इंदापूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षअॅड शुभम निंबाळकर,उमेश नेवाळे,अॅड. अमोल कुदळे ,महेश चव्हाण,पंकज पिसाळ आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की बार्शीत बार्शी, करमाळा,माढा तालुक्यासाठी 2014 साला पासून जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज चालू झाले. बार्शी वकील संघाने त्यावेळी वकील संघाची लायब्ररी नवीन जिल्हा व सत्र न्यायालयासाठी जागा अपुरी पडत असलेने सोडली. सध्याची जिल्हा व सत्र न्यायालयासाठी इमारत अपुरी पडत आहे.
उच्च न्यायालय,मुंबई यांनी देखील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी मान्यता दिलेली आहे.बार्शी येथील नवीन न्यायालयीन इमारतीचा प्रस्ताव विधी व न्याय खाते महाराष्ट्र राज्य यांचेकडे प्रलंबित आहे .
नवीन न्यायालयीन इमारतीचा प्रश्न बार्शी वकील संघाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.तसेच नवीन न्यायालयीन इमारतीसाठी यापूर्वीच 11 एकर जागा महाराष्ट्र
शासनाने संपादित/नियोजित केलेली आहे.
बार्शी वकील संघ सामाजिक बांधिलकी जपत असून 2019 च्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील महापूरावेळी 51 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला केलेली आहे.
आताची कोरोना/कोविड 19 ची आपत्ती मोठी आहे व महाराष्ट्र सरकार व तुमच्यावर मोठी जबाबदारी असल्याचे आम्हाला भान आहे. यातूनही आपण आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार कराल.
मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन बरेच दिवस प्रलंबित असलेल्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथील नवीन न्यायालयीन इमारतीचा प्रश्न मार्गी लावावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.