June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात  ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन

बार्शी ;
      कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे संस्थापित श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी जि. सोलापूर (महाराष्ट्र राज्य ) आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ०६ मार्च २०२१ रोजी एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय परिषदेचा  मुख्य विषय ‘ नवीन शैक्षणिक धोरण २०२०’ असा होता.

Advertisement

कोव्हीड १९ यामुळे शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. पारंपारिक शिक्षण प्रणाली सोडून ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा स्वीकार केला जात आहे. अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन, प्रशिक्षण आदि क्षेत्रांची परिमाणे बदलत आहेत. याचे शिक्षक, विद्यार्थी, पालक , समाज यांनी स्वागत केले आहे. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाने  ऑनलाईन शिक्षण प्रणाली देखील राबविली आहे. याचा  बी एड, बी पी एड, एम एड, एम पी एड, पीएच डी विध्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.

म्हणूनच महाविद्यालयाने एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. नवीन शैक्षणिक धोरण २०२० याविषयी माहिती घेणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन ही राष्ट्रीय स्तरावरील परिषद आयोजित करण्यात आला होती.
या परिषदेसाठी  कार्यक्रमाचे अध्यक्ष  म्हणून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव हे उपस्थित होते.  अध्यक्षीय भाषणातून डॉ बी वाय यादव यांनी संस्थेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती विशद केली. कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या विचारांचा वारसा अशा  प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारक बदल सुचविले आहेत. शिक्षणक्षेत्रातील या नवीन बदलाचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे.  यासंदर्भात सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे जाण्यासाठी सर्वांनी तयार रहावे. नवीन शिक्षण प्रणाली  ही सद्यस्थितीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. २१ व्या शतकातील संधी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांनी नवीन शिक्षण प्रणाली आत्मसात करावी असे आवाहन त्यांनी केले. 

महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ एस एस गोरे यांनी ऑनलाईन उपस्थित सर्वांचे स्वागत केले. महाविद्यालयाची गुणवत्ता, विकास व नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा वापर करून शिक्षण प्रक्रियेत गतिमानता व लवचिकता आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक धोरण २०२० यामुळे  शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल होणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरण २०२० यातील शिक्षणप्रणालीनुसार बदल आत्मसात करावेत असे आवाहन त्यांनी केले.

  परिषदेसाठी मुख्य साधन व्यक्ती  तथा मार्गदर्शक म्हणून झारखंड येथील डी ए व्ही शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय, गिरीधीहचे प्राचार्य डॉ मुकेश कुमार शर्मा  यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानाचा मुख्य विषय’ नवीन शैक्षणिक धोरण २०२०- फायदे आणि तोटे’ असा होता. नवीन शैक्षणिक धोरण २०२० या शिक्षण प्रणालीचे विविध पैलूंवर त्यांनी सविस्तर माहिती विशद केली.  प्रचलित शिक्षण प्रणाली व नवीन शिक्षण प्रणाली संकल्पना, घटक, संरचना, क्षेत्रे, परिमाणे, प्रभाव व उपयुक्तता यावर देखील मार्गदर्शन केले. उच्च शिक्षणातील आमूलाग्र बदलांवर चर्चा केली. शिक्षक व विद्यार्थी यांच्या भूमिका विशद केल्या. शिक्षक शिक्षणातील प्रणालीचे स्वरूप, गुणवत्ता, व्यावसायिक विकास,  शिक्षण क्षेत्रातील भविष्यातील  संधी आणि धोके आदि महत्वपूर्ण घटकांवर प्रभावी सादरीकरणातून सखोल मार्गदर्शन केले.

परिषदेच्या दुसऱ्या सत्राचे मुख्य साधन व्यक्ती  तथा मार्गदर्शक म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रो. डॉ. व्ही. बी.पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानाचा मुख्य विषय’ नवीन शैक्षणिक धोरण २०२०- शैक्षणिक संशोधन गुणवत्ता उत्प्रेरक’ असा होता. नवीन शैक्षणिक धोरण २०२० या शिक्षण प्रणालीचे विविध उपागम यावर त्यांनी सविस्तर माहिती विशद केली.   नवीन शिक्षण प्रणालीतील चिकित्सक विचार, नवनिर्मिती, संकल्पनात्मक आकलन, तंत्रज्ञानाचा वापर, सामाजिक सहभाग, समता,  विविधता, संरचना, क्षेत्रे, परिमाणे, प्रभाव व उपयुक्तता यावर देखील मार्गदर्शन केले. संशोधन क्षेत्रातील आमूलाग्र बदलांवर चर्चा केली.  गुणवत्ता पूर्ण संशोधन क्षेत्रातील घटक विशद केले. त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील उच्च  दर्जाच्या अध्यापनावर भर दिला. उच्च शिक्षणातील गुणवत्तापूर्ण संशोधनावर  शिक्षक व विद्यार्थी  यांनी  भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

या ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेसाठी महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यातील शिक्षक,  प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आदींसह   सुमारे ३९५     व्यक्तींनी  सहभाग नोंदवला. या परिषदेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले नव्हते. परिषदेमध्ये सहभागी झालेल्या सहभागी व्यक्तींना  ई-प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  समन्वयक डॉ पी ए पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव, साधन व्यक्ती डॉ मुकेश कुमार शर्मा व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस गोरे यांचा परिचय डॉ एम व्ही मते यांनी करून दिला. दुसऱ्या सत्राचे  साधन व्यक्ती डॉ व्ही बी पाटील यांचा परिचय डॉ आर ए फुरडे यांनी करून दिला.परिषदेसाठी उपस्थितांचे आभार डॉ एम एस डिसले यांनी व्यक्त केले.

परिषदेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस गोरे, नॅक आयक्युएसी समन्वयक प्रो. डॉ. व्ही पी शिखरे, समन्वयक डॉ पी ए पाटील, सह समन्वयक डॉ एम एस डिसले, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply