October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीचा रंगसरिया ! एक छोटीसी ‘कलरस्टोरी’

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

डिजीटलायझेनच्या अगोदरचा तो काळ होता. भींतीवर चित्र काढायचं असू द्या किंवा लस्सीच्या गाड्यावर अमिताभ बच्चनचं पेंटींग करायचं असू द्या, मंदिराच्या भिंती रंगवायच्या असू द्या किंवा मंदिरातील देवाला चित्रातून मूर्तरुप द्यायचं असू द्या. बार्शी तालुक्यासह आजूबाजूच्या 40 ते 50 खेडेगावातून एकच नाव पुढे यायचं, ते म्हणजे ‘ज्ञानेश्वर सुतार’. जामगावच्या या कलाकारानं आपल्या कलेतून कित्येकांना आनंद दिलाय. मात्र, डिजीटल फ्लेक्सचा जमाना आला अन् या चित्रकाराचं आयुष्य जणू काळ्या रंगानेच माखलं. कमी वेळात, हवं तसं चित्र मिळाल्यामुळं अनेकांना ज्ञानेश्वर सुतार नावाचा आणि त्यांच्या भन्नाट चित्रकलेचा विसर पडला.

न्यू हायस्कूलमध्ये शिकत असताना शाळेच्या भिंतीवर सरस्वतीचं चित्र दिसत होत, बाजूलाच पसायदान लिहलेलं होतं, तिथचं मांडी घालून ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांचंही चित्र रेखाटलं होत. या चित्राच्या कोपऱ्यात कुठतरी पांढऱ्या रंगानं ‘ज्ञानेश्वर सुतार’ हे नाव लिहलेलं असायचं. तर, गणेशोत्सवाच्या आदिल्यादिवशी आमच्या चौकात ‘आजोबा गणपती’ रंगवायला एक माणूस यायचा, त्यावेळी रंगलेला गणपती पाहिल्याशिवाय तिथून हलूच वाटत नसायचं. त्या रंगलेल्या गणपतीजवळही लिहलेलं असायचं ज्ञानेश्वर सुतार. मात्र, त्यावेळी लक्षात येत नसतं, व्हू इज ज्ञानेश्वर सुतार ?
     गेल्या 50 वर्षात ज्ञानेश्वरांनी आपल्या चित्रातून बार्शीतील कित्येक गणेश मंडळांना, नवरात्री उत्सव मंडळांना आणि देवस्थानांना आपलसं केलयं. या मंडळातील कार्यकर्त्यांवर आपल्या कामाची छाप पाडलीय. वयाच्या 83 व्या वर्षीही थरथरत्याने हाताने ज्ञानेश्वरांनी काढलेलं गाड्यावरील हे तुळजाभवानीचं चित्र, जणू साक्षात देवीचं अवतरली की काय, असाच भास करवून सोडतयं. मात्र, आपल्या जादुई हाताने साक्षात देवीचं दर्शन घडविणारा हा बार्शीचा ‘राजा रवि वर्मा’ आता पार थकलाय.

असाही एक किस्सा सांगितला जातो की, ज्ञानेश्वरांनी तमाशातील एका नर्तिकेचं हुबेहुब चित्र रेखाटल होतं. आपल्या जादुई फटकाऱ्यांनी नर्तिकेला सजवलं होतं. आपलं हुबेहूब चित्र पाहून ती नर्तिकाही ज्ञानेश्वरांच्या आणि त्यांच्या चित्राच्या प्रेमात रंगून गेली होती. मात्र, डिजीटलायझेशचा काळ आला, अन् ज्ञानेश्वरांकडून बरचं काही हिरावून गेला. 

बार्शीचा हा ‘रंगरसिया’ आज वृद्धापकाळातही रंगांवर प्रेम करतोय, मिळेल ते काम करुन आपला उदरनिर्वाह करतोय. आपल्या दोन्ही मुलांना रंगकामाला जुंपून आपले उरले-सुरले दिवस ढकलतोय. एक कप कडक चहा आणा बसं, अशी आरोळी देणारे ज्ञानेश्वर आता थकलेत. मात्र, चहाच्या कपाचा झुरका मारुन भींतीवर किंवा पत्र्यांवर फिरणारा ज्ञानेश्वरांचा हात, आजही त्यांच्या तरुणपणाचीचं साक्ष देतोय. त्यांच्या ब्रशचे फटकारे आजही दगडात देवाला जिंवत करतायेत. एकेकाळी येडशी, येरमाळा, पाथरी, पांगरी, कारी, नारी, उपळाई, अशा कित्येक खेडेगावांसह बार्शीतही ज्ञानेश्वरांचाच ब्रश चालायचा. मात्र, आपल्या केलेचं व्यवसायिकरण करण्याची कला नसलेल्या या कलाकारावर डिजिटल युगाने मात केली.

Leave a Reply