September 27, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

प्रवीण दरेकर आणि राधाकृष्ण विखेंना कोणते चॉकलेट देवून आणले होते? खडसेंचे प्रत्युत्तर

मुंबई : एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आज पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. एकनाथ खडसेंनी हाती घड्याळ बांधल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधी भाजप असा वाद रंगल्याचं पाहायला मिळतं.

‘मी जाणार हे गोपीनाथ गडावरच स्पष्ट झालं होतं. त्यावेळी मला थांबवण्यासाठी का आग्रह केला नाही? मला थांबण्यासाठी कुणाचा फोन आला नाही. एकदा चंद्रकांतदादा पाटलांचा फोन आला होता. पण, त्यांना माझी गरज वाटली नाही त्यामुळे त्यांनी फार आग्रह केला नाही.’ अशा शब्दात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गौप्यस्फोट केला आहे.

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीमध्ये लिमलेटची गोळी मिळते की कॅटबरी चॉकलेट मिळतं हे आम्हाला पण पाहायचं आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर खडसेंनी चोख प्रत्यूत्तर दिलं आहे. ‘भाजपामध्ये मोठ्या संख्येनं लोक आलेत. प्रवीण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देऊन आणलं आहे का? असा थेट सवाल खडसेंनी विचारला आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘अजित पवारांविरोधात गाडीभर पुरावे जे गाडीभर नव्हतेच ते घेवून ज्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी मोर्चा काढला त्यावेळी मी मोर्चात नव्हतो. देवेंद्र फडणवीसांनी पहाटे अजितदादांसोबत शपथ घेतली, त्यानंतर लगेच त्यांना क्लिनचीट दिली आणि आता तेच लोक आरोप करत’ असल्याची टीकाही यावेळी खडसेंनी केली.

‘माझ्यासोबत निवडून आलेले किती लोक येत आहेत हे महत्वाचे नाही, किती लोक निवडून आणू शकतो हे महत्वाचे आहे. सध्यातरी माझ्यासोबत पदावर असलेले कुठले आमदार, खासदार पक्षात येणार नाहीत. मात्र 10-12 माजी आमदार राष्ट्रवादीचे काम करतील’ असंही यावेळी खडसेंनी सांगितलं.

Leave a Reply