दोन हजाराची नोट बंद होणार का? वाचा चर्चेचे कारण..

नवी दिल्ली- मागील दोन वर्षांत 2 हजार रुपयांच्या नोटेची छपाई करण्यात आली नसल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली आहे. नोट छापली नसल्याने याचा तुटवडाही जाणवत आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, 30 मार्च 2018 मध्ये 2000 रुपयांच्या 336.2 कोटी नोटांचे वितरण झाले होते. तर 26 फेब्रुवारी 2021 मध्ये ही संख्या घटून 249.9 कोटी झाली.
अनुराग ठाकूर म्हणाले की, कोणत्याही मूल्याच्या बँकेच्या नोटांच्या छपाईचा निर्णय जनतेच्या देवाण-घेवाणीची मागणी पूर्ण करण्यासाठी आरबीआयच्या सल्ल्यानुसार घेतला जातो. 2019-20 आणि 2020-21 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांच्या छपाईची ऑर्डर दिलेली नाही.
आरबीआयने म्हटले की, 2019 मध्ये सांगण्यात आले होते की, आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये (एप्रिल 2016 ते मार्च 2017 पर्यंत) 354.2991 कोटी नोटांची छपाई केली होती. परंतु, 2017-18 मध्ये केवळ 11.1507 कोटी नोटांची छपाई करण्यात आली. 2018-19 मध्ये 4.669 कोटी नोटा छापण्यात आले. एप्रिल 2019 नंतर एकही नोट छापण्यात आली नाही.
काळा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते. नोव्हेंबर 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढल्यानंतर सरकारने 500 रुपयांच्या नव्या नोटा आणि 2 हजार रुपयांच्या नोटा जारी केल्या होत्या. 2000 रुपयांच्या नोटांशिवाय सरकारने 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या आहेत.