October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

त्या दोघी बहिणी निघाल्या गर्भवती,तिहेरी हत्याकांड प्रकरण

मोताळा (जि.अकोला) : मुलीच्या अनैतिक संबंधातून तिघ्या मायलेकींचा निर्घृण खून झाल्याची घटना पिंपळखुटा बुद्रुक येथे ता. १४ ऑक्टोबरला घडली होती. यातील आरोपी दादाराव अंबादास म्हैसागर हा पोलिस कोठडीत आहे. या तिहेरी हत्याकांडातील दोघ्या बहिणी गर्भवती निघाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या गर्भाचा डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती बोराखेडी पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा बुद्रुक येथील सुमनबाई शंकर मालठाणे (५५), विधवा मुलगी राधा (२८) व घटस्फोटीत मुलगी शारदा (२५) या तिघ्या मायलेकींची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना ता.१४ ऑक्टोबर रोजी घडली होती. गावातीलच आरोपी दादाराव म्हैसागर व राधा यांचे सुत जुळले होते. त्यातून राधाला गर्भधारणा झाल्याची चर्चा होती.

या गर्भाचा सोक्षमोक्ष लावण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता. अनैतिक संबंध चव्हाट्यावर येऊ नये म्हणून आरोपी दादाराव म्हैसागर याने तिघ्या मायलेकींची हत्या केली. दरम्यान, बोराखेडीचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत काही तासातच गुन्ह्याची उकल केली.

पोलिसांनी आरोपी दादाराव अंबादास म्हैसागर (३८) यास गजाआड केले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तिघ्या मायलेकींचा खून केल्याची कबुली दिली. दरम्यान, तिघ्या मायलेकींच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, राधा व शारदा या दोघ्या बहिणी गर्भवती निघाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या गर्भाचे डीएनए अमरावती येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

आरोपी दादाराव म्हैसागर याची सुद्धा डीएनए तपासणी केल्या जाणार आहे. त्याचा डीएनए गर्भातील डीएनए सोबत जुळते का, याची तपासणी होणार आहे. बोराखेडीचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड या गंभीर प्रकरणाचा बारकाईने तपास करीत असून, पीएसआय अशोक रोकडे, पोहेकाँ नंदकिशोर धांडे, भगवान पारधी, राजेश आगाशे, राजकुमार खेडेकर, सुनील जाधव, राजेश हिवाळे, गणेश बरडे, संदीप नरोटे, मंगेश पाटील, सुनील भवटे, ज्ञानेश्वर धामोडे, उज्वला पवार, चालक एएसआय शेख मुस्तकीम, नापोकाँ समीर शेख यांनी गुन्ह्याची उकल करण्यात मोलाचा सहभाग नोंदविला आहे. डीएनए तपासणीत काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तिघींच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव
आरोपी दादाराव म्हैसागर याने राधा व शारदा या दोघा बहिणींचा मृतदेह ओसाड विहिरीत फेकला होता. तर, सुमनबाईचा मृतदेह एका शेतातील हौदात टाकलेला होता. विशेष म्हणजे, तिघ्या मायलेकींच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्यांना ठार केल्याचे समोर आले आहे.

तिहेरी हत्याकांडाचा बारकाईने तपास सुरू
आरोपी दादाराव म्हैसागर याने गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड, मोबाईल व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलिस बारकाईने तपास करीत आहेत. वैद्यकीय, तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहे. सायबर सेल व फॉरेन्सिक एक्सपर्टची मदत घेतली जात असल्याची माहिती आहे.

Leave a Reply