June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

छत्रपती ग्रुपच्या मावळ्यांनी मुस्लीम क्रबस्तानची केली साफ-सफाई

बार्शी ;
येथील उडान फाउंडेशनने शहरातील परंडा रोडवर असलेल्या मुस्लिम कब्रस्तान (दफनभूमि) मधील वाळलेले गवत, कटेरी झुडपे, पाऊल वाट, अंतर्गत रस्ते आदि ठिकाणी साफ सफाईच्या कामाला प्रारंभ केला आहे. गेल्या 8 दिवसांपासून तरुणाई या कामी आपलं योगदान देत आहे. विशेष म्हणजे या तरुणांचा उत्साह आणि निस्वार्थ भावना पाहून शहरातील विविध संघटना आणि मान्यवरही साफ-सफाई कामात उतरले आहेत. छत्रपती गुप्र आणि विजेता जीमच्या जवळपास 60 ते 70 सदस्यांनीही आज या कामात आपलं योगदान दिलं.

बार्शीतील तरुणाई सामाजिक आणि विधायक उपक्रमांसाठी आवर्जून पुढे येत आहे. कुठलेही काम हलके किंवा कमी महत्त्वाचे न मानता प्रत्येक कामात योगदान देत आहे. शहरातील जाणीव फाऊंडेशनने स्मशानभूमीत वृक्षलागवड करुन तेथील चेहरा-मोहरा बदलला. त्यानंतर, मुस्लीम तरुणांनीही कब्रस्तानच्या नुतनीकरण व सुशोभीकरणाला सुरुवात केली आहे. छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष अजय टिंकू पाटील यांनीही आपल्या मित्र परिवारासमवेत रविवार सुट्टीचा दिवस गाठून सकाळी 2 ते 3 तास योगदान देत, दफनभूमीतील कचरा, गवत, काटेरी झुडपे काढले. समाजकाम हे जातधर्मापलिकडे असते, ते समाजासाठी आणि रयतेसाठी ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनीच आपल्याला दिलीय, त्याच भावनेतून आम्ही कब्रस्तान साफसफाईसाठी योगदान दिल्याचं पाटील यांनी म्हटलं. छत्रपती ग्रुपचा सामाजिक आणि विधायक कार्यक्रमांत सातत्याने सहभाग असतो.

दरम्यान, उडान फाउंडेशन बार्शी व ऑल मुस्लिम समाज बार्शीच्यावतीने सुरुवात करण्यात आलेल्या या कामाने गती घेतली आहे. क्रबस्तान नुतणीकरणाचे काम तरुणाईनेच हाती घेतले आहे, त्यामुळे लवकरच येथे मोठा बदल दिसून येईल.

Leave a Reply