June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कोरोणा रूग्ण 300,जेवनावळ मात्र 800 माणसांची

मुंबई: कोरोनाच्या आपत्तीत इष्टापत्ती साधत काही विशिष्ट कंत्राटदारांनी महापालिकेकडून मोठे बिल उकळण्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात केवळ 110 ते 310 रुग्णसंख्या असताना दररोज 800 माणसांच्या जेवणावळीचे तब्बल 33 लाख 65 हजारांचे बिल काढण्यात आले आहे. या धक्कादायक प्रकाराला भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

कोरोनाच्या काळात शहरातील विविध भागात मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून क्वारंटाईन केंद्रे उभारण्यास सुरूवात झाली होती. या केंद्रात दाखल झालेले रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना चहा, नास्ता, दोन्ही वेळचे जेवण पुरविण्यासाठी 280 रुपयांचे पॅकेज मंजूर करण्यात आले होते.

ठाणे महापालिका हद्दीत 15 एप्रिल रोजी रुग्णांची संख्या 110 होती. तर 30 एप्रिल रोजी रुग्णसंख्या 310 पर्यंत पोहोचली होती. मात्र, 15 एप्रिल ते 30 एप्रिल या काळात क्वारंटाईन केंद्रातील रुग्ण, वैद्यकीय आणि महापालिकेतील कर्मचारी आदींना सुमारे 800 जणांना जेवण दिल्याचे बिल आकारण्यात आले आहे. या बिलापोटी महापालिकेकडून 33 लाख 65 हजारांचे बिल मंजूर करण्यात आले. नुकत्याच झालेल्या महासभेत या बिलावर शिक्कामोर्तबही करण्यात आले.

एप्रिल महिन्यामध्ये शहरात संसर्ग झालेले अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यासाठी ठाणे महापालिकेने चार खाजगी रुग्णालयांना मंजुरीही दिली होती. तर काही रुग्ण आणि रुग्णांच्या कुटुंबियांना भाईंदरपाडा, कासारवडवली आणि मुंब्रा येथील क्वारंटाईन केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, दररोज 800 जणांना जेवण देण्याएवढी रुग्णसंख्या निश्चित नव्हती, याकडे भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.

शहरातील क्वारंटाईन केंद्रात दररोज कोणाला जेवण दिले गेले. त्यातील रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांची यादी प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी महापालिकेकडे केली आहे.

Leave a Reply