October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

उसाचे फुले वान देतो 118 टनांचा उतारा,राहुरी विद्यापिठाचा लागवडीचा सल्ला

राहुरी विद्यापीठ : अखिल भारतीय समन्वित ऊससंशोधन प्रकल्पाची 33वी राष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच झाली. महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मध्यवर्ती ऊससंशोधन केंद्र, पाडेगाव येथे विकसित केलेल्या, “फुले 10001′ या लवकर पक्व होणाऱ्या वाणाची, राष्ट्रीय पातळीवर केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरात येथे लागवडीसाठी, कार्यशाळेत शिफारस करण्यात आली.

“फुले 265′ आणि “एमएस-602′ या दोन वाणांचा संकर करून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथेच निर्माण केलेला हा पहिलाच ऊस वाण असून, तो द्वीपकल्पीय विभागातील 34 चाचण्यांमध्ये कोसी 671 आणि को 86032पेक्षा ऊस आणि साखरउत्पादनात सरस ठरला आहे.

द्वीपकल्पीय विभागातील 14 वेगवेगळ्या संशोधन केंद्रांवर घेतलेल्या एकूण 34 प्रयोगांत (प्रथम, द्वितीय पीक व खोडवा) “फुले 10001′ वाणाचे हेक्‍टरी ऊसउत्पादन 118.51 टन, तर साखरउत्पादन 16.84 टन मिळाले आहे.

“फुले 10001′ वाणाच्या उसाची पाने रुंद आणि गर्द हिरवी असून, पानांच्या देठावर कुस नाही. ऊस जाड, मऊ आणि कांड्या सरळ आहेत. तुऱ्याचे प्रमाण अल्प आहे. हा वाण खोडकीड, कांडीकीड, पिठ्या ढेकूण, शेंडेकीड यांना मध्यम प्रतिकारक आहे.

तांबेरा, तपकिरी ठिपके आणि काणी रोगास प्रतिकारक असून, मर आणि लालकूज रोगांना मध्यम प्रतिकारक आहे. या वाणाची निर्मिती आणि प्रसारित करण्यात माजी ऊस विशेषज्ञ व ऊस पैदासकार डॉ. एस. एम. पवार, ऊस विशेषज्ञ डॉ. भारत रासकर, ऊस पैदासकार डॉ. आर. एम. गारकर, माजी ऊस पैदासकार डॉ. डी. ई. कदम, तसेच कनिष्ठ संशोधन सहायक डॉ. डी. एस. थोरवे यांचे योगदान आहे.

Leave a Reply